अशा पद्धतीने करा सातबारा डाउनलोड; १५ रुपयांत मिळणार उतारा!

डिजिटली स्वाक्षरीकृत असलेले सातबारा उतारे ऑनलाइन उपलब्ध झाल्यानंतर आता उतारे मोबाइलवरूनही डाउनलोड करता येणार आहेत.

त्यासाठी केंद्र सरकारने उमंग हे ॲप विकसित केले असून, राज्यातील सर्व अडीच कोटी सातबारा त्यावर उपलब्ध असणार आहेत. पोर्टलप्रमाणेच १५ रुपयांतच उतारा मिळणार आहे.

राज्यातील ३५ जिल्ह्यांतील ३५८ तालुक्यांत ४४ हजार ५६० महसुली गावे आहेत. यात २ कोटी ५७ लक्ष सातबारा संगणकीकृत केले असून, ९९ टक्क्यांपेक्षा जास्त उतारे डिजिटल स्वाक्षरीकृत केले आहेत. महसूल विभागाने विकसित केलेल्या महाभूमी या पोर्टलवरून १५ रुपयांत उपलब्ध होत आहे. आता हीच सुविधा केंद्र सरकारच्या उमंग या मोबाइल ॲपवरून उपलब्ध होणार आहे. हे मोबाइल ॲप गुगल प्ले स्टोअरवरून ॲन्ड्रॉईड, ॲपल मोबाइलसाठी ॲप्स स्टोअरवरून उपलब्ध करून दिले आहे.

राज्यातील दीड ते दोन लाख नागरिक दररोज या डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उतारा, फेरफार, खाते उतारे व मिळकत पत्रिकांचा वापर करत आहेत. आजवर महाभूमी पोर्टलवरून साडेपाच कोटी डिजिटल स्वाक्षरीत नमुने डाउनलोड केले आहेत. त्यातून राज्य सरकारला १०५ कोटी ७२ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. आज अखेर महाभूमी पोर्टलवर २२ लाख नोंदणीकृत वापरकर्ते या सेवांचा लाभ घेत आहेत. यापूर्वी नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उताऱ्याची प्रिंट मिळविण्यासाठी महा-ई सेवा केंद्र किंवा झेरोक्स सेंटर यांचा आधार घ्यावा लागत होता. परिणामी १५ रुपयांच्या सातबारा उताऱ्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत होते.

पोर्टलवर ही सुविधा १५ रुपयांत देण्यात येत होती. आता उमंग मोबाइल ॲपवर डिजिटल स्वरूपात उतारा उपलब्ध होणार असून, त्याची प्रिंट न काढताच अन्य व्यक्तीला अथवा कार्यालयांना तो पाठविता येईल. याच ॲपवरून आपल्या खात्यावर पैसे भरता येतील. ॲपवरूनच सातबारावरील डॉक्युमेंट आयडीवरून त्याची अचूकता पडताळणी करता येईल.

आता डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उमंग मोबाइल ॲपवरून देखील उपलब्ध होणार असल्याने त्याची उपलब्धता अत्यंत सोपी व सहज होईल. ॲपवर अकाऊंट तयार करून त्यात पैसे जमा केल्यानंतर ओटीपी आल्यानंतर या अकाऊंटमधून १५ रुपये वळते झाल्यावर उतारा डाउनलोड होणार आहे. यातून शेतकऱ्यांचा वेळही वाचणार आहे.

अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment