लग्नाविषयी प्रभासचा मोठा खुलासा; विवाहस्थळाविषयी दिली माहिती

दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. मंगळवारी या चित्रपटाचा आणखी एक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला.

यावेळी कार्यक्रमाला चाहत्यांची मोठी गर्दी पहायला मिळाली. तिरुपती बालाजी मंदिराजवळ हा ट्रेलर लाँचचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात साऊथ सुपरस्टार प्रभासला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला गेला. त्यावर त्याने दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आदिपुरुष या चित्रपटात प्रभास, क्रिती सनॉन, सैफ अली खान, सनी सिंग आणि देवदत्त नागे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

गेल्या काही दिवसांपासून प्रभासचं नाव अभिनेत्री क्रिती सनॉनशी जोडलं जात आहे. हे दोघं एकमेकांना डेट करत असून लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आदिपुरुषच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात प्रभासला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला. प्रभासने याआधी त्याच्या लग्नाविषयी कधी प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र पहिल्यांदाच त्याने त्यावर मौन सोडलं आहे. इतकंच नव्हे तर त्याने लग्नाचं स्थळसुद्धा जाहीर केलं आहे.

‘बाहुबली’ फेम प्रभासचं नाव याआधी दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत जोडण्यात आलं होतं. ‘बाहुबली’मधील ही जोडी तुफान चर्चेत होती. मात्र अनुष्काने वेळोवेळी डेटिंगच्या चर्चा नाकारल्या आहेत. प्रभास आणि मी फक्त चांगले मित्र आहोत, असं तिने स्पष्ट केलं होतं. आता लग्नाविषयी प्रश्न विचारताच प्रभास म्हणाला, ‘मी इथेच तिरुपतीमध्ये लग्न करणार आहे.’ त्याचं हे उत्तर ऐकून चाहत्यांनी एकच जल्लोष केला. आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रभास त्याच्या लग्नाची घोषणा करू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

‘आदिपुरुष’च्या शूटिंगदरम्यान प्रभास आणि क्रितीची चांगली मैत्री झाली आणि याच मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं, अशी चर्चा आहे. ‘भेडिया’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान क्रितीला यासंदर्भात प्रश्न विचारला गेला होता. त्याचं उत्तर देताना तिने प्रभासशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ‘टायगर श्रॉफ, प्रभास आणि कार्तिक आर्यन या तिघांपैकी तू कोणासोबत फ्लर्ट, डेट आणि लग्न करू इच्छितेस’, असा प्रश्न क्रितीला एका मुलाखतीत विचारला गेला. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली होती, “कार्तिक आर्यनसोबत फ्लर्ट करेन, टायगरला डेट करेन आणि प्रभासशी लग्न करेन.” इतकंच नव्हे तर ऑनस्क्रीन आम्ही दोघं खूप चांगले दिसतो, असंही ती म्हणाली होती.

Leave a Comment