एखाद्या व्यक्तीचा मूलांक ओळखायचा असेल तर आपण फक्त जन्मतारीख जन्ममहिना व जन्मवर्ष या तिन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. मूलांकाला जेव्हा भाग्यांकाची साथ लाभते तेव्हा जीवनातील खूप खोलवर गोष्टीचा उलगडा होत जातो. भाग्यांक म्हणजे पूर्ण जन्मतारखेची बेरीज करून येणारा एकांक, यास भाग्यांक असे म्हणतात. आजच्या लेखात आपण मूलांक सात ते नऊ यांच्या २०२४ मधील भविष्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तुमचा किंवा तुमच्या प्रियजनांचा मूलांक यातील एक असल्यास त्यांचा स्वभाव व भविष्य या दोन्हीचे अंदाज आवर्जून जाणून घ्या..
मूलांक सात
ज्यांचा जन्म सात, सोळा, पंचवीस या तारखांना झालेला आहे अशांचा मूलांक सात असतो. अशा व्यक्ती खूप स्वतंत्र विचाराच्या व आपल्या तत्वाशी एकनिष्ठ असतात. यांची मते ठाम व न बदलणारी असतात यांना प्रवासाची खूप आवडत असते तर समुद्र किनारी पाण्याच्या आजूबाजूला राहण्यात यांना खूप आनंद वाटत असतो. अशा व्यक्ती उत्तम लेखक, कवी, चित्रकार, शिल्पकार असतात. त्यांना यांच्या कलागुणातून आर्थिक लाभ होत असतो. अतिशय लहरी मुडी स्वभाव त्यामुळे जीवन जगण्याच्या यांच्या कल्पना फार वेगळ्या असतात. अतिशय नि:स्वार्थी त्यामुळे आजुबाजूची माणसे यांच्याकडे खूप विश्वासाने पाहत असतात. संसारातही आपलेपण जपून अध्यात्मातला आनंद घेत असतात.
यावर्षी २०२४ साली २+ ०+ २+ ४+ = ८ म्हणजे शनी वर्षभर सात अंकावर आठ अंकाचा प्रभाव असणार आहे. त्यामुळे सात अंकातील हळवेपणा, भावनिकता कमी होऊन खऱ्या अर्थाने स्वत:साठी जगणे किती महत्त्वाचे आहे आणि कसे जगावे याची जाणीव आठ अंकाच्या सहवासातून मिळेल. बेसुमार पैसा खर्च करणे, गरज नसताना एखाद्याला पैसा देत राहणे या साऱ्या चुकीच्या सवयी बंद होऊन हळूहळू पैशाची बेछूट वागण्याची सवय बंद होईल.
भविष्यकाळात काय करावे, कशा योजना असाव्यात याचे नव्याने विचार मंथन चालू होईल. नवीन काम – उद्योग धंद्याच्या कल्पना डोक्यात येतील. आरोग्याच्या बाबतीत पोटाचे आजार, सायनस, डोकेदुखी, सर्दी, सांधेदुखी या आजाराबाबत विशेष काळजी घ्यावी. वैवाहिक जीवनात एकमेकांच्या आरोग्याची काळजी आणि रोजच्या गरजा, आवडी – निवडी या विषयी चर्चा करून निर्णय घ्यावेत.
शुभ रंग :-पांढरा, आकाशी, केशरी
मूलांक आठ
ज्यांचा जन्म आठ, सतरा, सव्वीस या तारखांना झाला आहे त्यांचा मूलांक आठ असतो. या मूलांकावर शनी ग्रहाचा अंमल असतो. खूप वेळा यांची मानसिकता वर- खाली होत असते. कधी खूप समजूतदार आज्ञापालन करणारा, त्याग करण्याची वृत्ती, अत्यंत विश्वासू संकटात मदत करणारा तर कधी मितभाषी; भावूकता नसलेला, गरजेपुरता संबंध ठेवणारा अत्यंत कंजूषपणे वागणे अशी विविध रुपे या आठ मूलांकात आढळतात. एक मात्र चांगली गोष्ट आहे, २०२४ साली कुंडलीशास्त्राप्रमाणे शनी स्वत:च्या कुंभ या वायू अर्थात बौद्धिक राशीतून प्रवास करीत आहे तो आठ अंकाला खूप मदतीचा ठरेल.
विशेष करून २०२४ या वर्षी २+ ०+ २+ ४+ = ८ हा शनीचा अंक आहे. यावर शनीचा प्रभाव दिसणार आहे. अतिशय मेहनती, व्यवहारात सचोटीने वागणे अशा अनेक सद्गुणांचा वापर केला तर उद्योगधंद्यात नोकरीत धनलाभ, मानसन्मान लाभेल. तसेच ‘उत्तम संवाद’ हा व्यापारी जगातला मध्यबिंदू आहे. तेंव्हा आपल्या मितभाषी स्वभावाला मुरड घालून आपल्या सभोवतालच्या लोकांशी परिचय करून घ्या. त्यांच्याशी संवाद साधा तो या वर्षाच्या उत्कर्षाचा खरा केंद्रबिंदू ठरेल. घरातील कौटुंबिक वातावरणात समरस झाल्याने मनांत नेहमी येणारे दडपण दूर होईल. शिक्षणात विद्यार्थी वर्गाला मेहनतीतून यश लाभेल. अभ्यासासाठी वेळ काढा.
मूलांक आठच्या लोकांनी मूलांक तीन व सहाच्या संपर्कात नेहमी रहावे. हे मूलांक तुमचे मित्रांक आहेत. आरोग्याच्या बाबतीत हाडाचे विकार, पोटऱ्या दुखणे अपचन यापासून काळजी घ्यावी.
शुभरंग – आकाशी, चॉकलेटी.
मूलांक नऊ
ज्यांचा जन्म नऊ, अठरा, सत्तावीस तारखांना झाला आहे. अशांचा मूलांक नऊ असतो. या मूलांकावर मंगळ ग्रहाचा प्रभाव दिसून येतो, अतिशय साहसी आणि कृतिशील स्वभाव योग्य निर्णय घेऊन कारवाई करणे कुठलीही कारणे वा दिरंगाई खपवून न घेणाऱ्या व्यक्ती पोलीस किंवा संरक्षण विभागात उच्च अधिकारी म्हणून काम करतांना दिसून येतात. अंगात उत्तम धडाडी, साहसी वृत्तीने जगण्यात यांना एक वेगळे समाधान लाभत असते. दुसऱ्याच्या उपयोगी पडावे त्याला संकटातून बाहेर काढावे हा त्यांचा मूळ उद्देश असतो आणि त्यात त्यांना खूप आनंद लाभतो.
यावर्षी २०२४ साली २+ ०+ २+ ४+ = ८ हा शनीचा अंक वर्षभर मूलांक नऊवर आपले वर्चस्व ठेवणार आहे. खरंतर शनी हा मंगळाचा मित्र ग्रह नाही. तापट साहसी व्यक्ती शनीचा हट्टीपणा हेकेखोरपणा सहन करणार नाही, पण मंगळाचा पुढील प्रवास चांगला होण्यासाठी नऊ अंकाने संयमाने राहून आपला पुढील कार्यभाग साधणे खूप हिताचे ठरेल. उद्योगधंद्यात कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करतांना त्यांतील तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच कामाला सुरुवात करावी. नवीन नोकरी शोधणे. नव्या नोकरीचा विचार करून जुनी नोकरीमध्येच सोडून देणे अतिशय धोक्याचे ठरू शकते. कर्ज काढून उद्योगधंदा करणे. चुकीच्या लोकांशी आर्थिक व्यवहार करणे खूपच धोकादायक ठरेल. पैशाच्या व्यवहारात जामीन राहणे उसने पैसे देणे, नुकसानीचे ठरेल.
वाहने सांभाळून चालवणे, राग- स्पर्धा या गोष्टी भर रस्त्यात हानीकारक ठरतील. शेअर मार्केटमधील पैसा लावणे, सट्टा खेळणे जोखीमेचे असेल. जुन्या आजारांवरची औषधे वेळेवर घ्यावीत. शिक्षणाच्या बाबतीत परदेशगमन योग संधी चालून येतील. या काळात मूलांक तीन व सहा हे आपल्याला खूप मदतीचे ठरतील. वैवाहिक सुखात गैरसमज हट्टीपणा टाळा. क्षमाशील वृत्तीने राहण्याचा प्रयत्न करावा. आरोग्याबाबतीत धावपळ दगदग टाळा.