गणपती बाप्पांना या गोष्टी बाप्पाला पसंत नाहीत अजिबात करु नका ; अन्यथा नुकसान अटळ!

मित्रानो,महादेव शिवशंकर आणि पार्वती देवी यांचा पुत्र म्हणून गणपती ओळखला जातो. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे, त्याचबरोबर बुद्धीची देवताही आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात प्रथमेशाच्या किमान नामस्मरणाने केली जाते. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत.

अगदी पुराणातही घरोघरी गणपती विराजमान झाल्याचे दाखले आढळतात. मंगळवार, १९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणपतीच्या बाबतीत अनेक गोष्टी प्रचलित आहेत. मात्र, काही गोष्टी गणपती बाप्पाला अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाहीत, असे सांगितले जाते. अशा गोष्टी टाळणेच सर्वोत्तम ठरते. अन्यथा काही अटळ नुकसान होऊ शकते, अशी मान्यता आहे.

गणपती ही वैश्विक आणि वैदिक देवता आहे. गणपती हा गणनायक आहे. विघ्नहर्ता आहे. विद्यांचा देव आहे. योग्यांचे ध्यान आहे. तो ओंकार स्वरूप आहे. गणपती हा समाजसंघटक आहे व सामाजिक दृष्टीने विश्वव्यापी आहे. अशा या गणपतीरायाला काही गोष्टी मात्र अजिबात आवडत नाहीत.

कोणत्याही व्यक्तीने या गोष्टींचा त्याग केला नाही, तर गणपती अत्यंत क्रोधीत होतो. विघ्नहर्ता असलेला गणपती अशा व्यक्तींना धडा शिकवल्याशिवाय राहत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पुराणात यासंदर्भात काही दाखले दिले जातात. गणपतीला न आवडणाऱ्या गोष्टींचा त्याग केल्यास गणपतीची शाश्वत कृपा आणि शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते.

गणपती बाप्पाला अहंकार अजिबात आवडत नाही. गणपतीचे शुभाशिर्वाद प्राप्त करून घ्यावयाचे असतील, तर आपल्यातील अहंकार प्रथम संपुष्टात आणला पाहिजे. विष्णूंचे अवतार मानल्या गेलेल्या चिरंजीव परशुराम यांनाही एकदा अहंकाराने ग्रासले. गणपती बाप्पाने परशुरामांचा अहंकार संपुष्टात आणला. ब्रह्मवैवर्त पुराणात यासंदर्भातील कथा आढळते. महादेवांची भेट घेण्यासाठी परशुराम कैलासावर गेले होते.

गणपतीने त्यांना रोखले. महादेवांची आज्ञा प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपणास पुढे जाऊ देऊ शकत नाही, असे गणपतीने सांगितले. गणपती ऐकत नाही म्हटल्यावर परशुरामांचा क्रोध अनावर झाला आणि ते युद्धाला उभे राहिले. गणपतीने परशुरामांना मोठे आव्हान दिले. परशुरामांनी आपल्या परशुने गणपतीवर जोरदार प्रहार केला. यात गणपतीचा एक दंत निखळला. तेव्हापासून गणपती एकदंत नावाने ओळखला जातो. परशुरामांच्या अहंकाराचा समाचार घेण्यासाठी गणपतीने परिस्थिती युद्धापर्यंत नेली, असे सार या कथेचे सांगितले जाते.

गर्वाचे घर खाली, असे म्हटले जाते. गणपतीने कुबेरांना धडा शिकवण्यासाठी त्यांचा खजिनाच रिकामा केला. एकदा कुबेरांना त्यांच्या खजिन्याचा प्रचंड गर्व झाला. वैभव, ऐश्वर्याचा दिखावा करण्यासाठी त्यांनी महादेवांना भोजनाचे निमंत्रण दिले. माझ्याऐवजी गणपती येईल, असे महादेवांनी सांगितले. गणेश मूषकाला घेऊन कुबेरांकडे गेला. गणपतीने कुबेरांनी केलेली सर्व पक्वान्ने तर फस्त केलीच.

शिवाय त्यांच्याकडे असलेल्या वस्तूही गिळंकृत करायला लागले. शेवटी घाबरून कुबेर पार्वती देवीला शरण गेले. पार्वतीने कुबेरांजवळ गणपतीला खाण्यासाठी एक मोदक पाठवला. एक मोदक खाताच गणपतीचे पोट एकदम भरले. तेव्हा एका बालकाला पोटभर जेवण देऊ शकत नाही, तर तुमच्या ऐश्वर्याचा, वैभवाचा काय फायदा, असे खडे बोल गणपतीने सुनावले. या एका वाक्यामुळे कुबेरांचा सगळा गर्व गळून पडला. कुबेरांनी क्षमायाचना केल्यावर गणपतीने त्यांचे वैभव त्यांना परत दिले.

कोणत्याही व्यक्तीने केलेले अमर्याद व्यवहार गणपतीला अजिबात पसंत नाही. यामुळेच गणपतीने थेट महादेवांसोबत युद्ध केले. पार्वतीने एक मूर्ती घडवून त्यात प्राण फुंकले आणि गणपतीचा जन्म झाला. पार्वती देवीने प्रवेशद्वारावर पाहारा देण्यासाठी गणपतीला बसवले. महादेवांना पार्वती देवीची भेट घ्यायची होती. मात्र, गणपतीने त्यांना रोखले. शिवाने जबरदस्तीने आत जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गणपती त्यांच्यासमोर उभे ठाकले. महादेवांना क्रोध अनावर झाल्यावर त्यांनी गणपतीशी युद्ध पुकारले. मात्र, आपल्याच पुत्राशी आपण युद्ध करताहोत, याची त्यांना कल्पना नव्हती.

जी व्यक्ती दुसऱ्यांना त्रास देते, कष्ट देते, अशा व्यक्तींवर गणपतीची कधी कृपा होत नाही. गणपतीने मूषकासुर नामक दैत्याला धडा शिकवला. मूषकासुर खूपच उपद्रवी होता. सर्वसामान्य नागरिकांपासून ते साधु-संतांपर्यंत तो सर्वांनाच त्रास देत असे. मूषकासुराच्या त्रासाला कंटाळून शेवटी सर्व साधुंनी गणेशाचा धावा केला. गणपतीला शरण जाऊन त्यांनी त्यांची व्यथा मांडली. गणपतीने मूषकासुराचा चांगलाच धडा शिकवत आपले वाहन म्हणून निवडले. इतकेच नाही, तर त्याच्या सर्व शक्तींचा क्षय केला.

उपासना, आराधना, नामस्मरण या माध्यमातून गणेशचे शुभाशिर्वाद प्राप्त करू इच्छिणाऱ्यांनी कोणत्याही मोहात वा प्रलोभनात पडू नये, असे सांगितले जाते. क्रोधीत होऊन तुलसीला गणपतीने एक शाप दिला होता. मात्र, तुलसीने क्षमायाचना केली. शांत होऊन, श्रीविष्णूंच्या पूजनात आपल्याला अत्यंत वरचे स्थान मिळेल, असा उःशाप गणपतीने दिला, अशी एक कथा पुराणात सांगितली जाते.

Leave a Comment