गुरुवार २१ सप्टेंबर ; गौरी आवाहनाचा मुहूर्त आणि सविस्तर विधी!

मित्रानो, भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते. ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात, म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात. गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते. भाद्रपद चतुर्थीला घरोघरी आलेल्या आपल्या गणोबाचा पाहुणचार नीट सुरु आहे ना, जणू काही हे तपासायला ती येते.

तिलाही माहेरचे सुख मिळावे म्हणून गौरी पूजनाच्या निमित्ताने तिचाही थाट माट आनंदात केला जातो. मात्र फार काळ ती मुक्काम न करता सप्तमीला येते, अष्टमीला जेवते आणि नवमीला तृप्त होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन स्वगृही जाते. त्या सोहळ्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

भाद्रपद महिन्यात शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षरात गौरी आवाहन केले जाते. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु तुम्हाला कदाचित माहित नसावे, हा सण साजरा करण्याच्या प्रथा मात्र प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या आहेत.

काही ठिकाणी गौरीला गणरायाची आई संबोधले जाते तर काही ठिकाणी बहीण. परंतु प्रचलित कथेनुसार, माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे. गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता आहे. म्हणून काही भागात या सणाला महालक्ष्मी पूजा असे देखील म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.

पद्मपुराणानुसार, समुद्र मंथनातून विष निघाल्यानंतर गौरीची उत्पत्ती झाली होती. लाल वस्त्र परिधान केलेल्या या देवीला चार हात होते. एका हाताने अभय मुद्रा, दुसऱ्या हातात वर म्हणजेच आशीर्वाद मुद्रा, तिसऱ्या हातात बाण आणि चौथ्या हातात धनुष्य होते. ती नेहमी कमळावर विराजमान असते. पिंपळ हे तिचे निवासस्थान मानले जाते.

पौराणिक मान्यतेनुसार, राक्षसांनी पीडित पृथ्वीवरील स्त्रियांनी आपल्या पतीच्या रक्षणासाठी गौरीकडे आश्रय घेतला होता. तेव्हा गौरीने असुरांचा वध करून पृथ्वीवरील स्त्रियांचे शील रक्षण केले. त्यामुळे तिच्याप्रती कृतज्ञता म्हणूनही गौरीचे व्रत करतात. गौरीच्या पूजेने दु:ख दूर होते, दुर्दैव नाहीसे होते, दारिद्र्य दूर होते. मन प्रसन्न होते.

२१ सप्टेंबर रोजी दुपारी १४. १६ मिनिटांनी सप्तमी सुरू होईल, त्यानंतर दुपारी ३. ३५ पर्यंत गौरीला घरी आणून आसनस्थ करावे.

ज्येष्ठा गौरी पूजन तिथी : २२ सप्टेंबर -ज्येष्ठा गौरी पूजन मुहूर्त : दुपारी १२ च्या आधी गौरी पूजन करून गौरीला नैवेद्य दाखवावा. ज्येष्ठा गौरी विसर्जन तिथी : २३ सप्टेंबर – ज्येष्ठा गौरी विसर्जन मुहूर्त : सकाळी ९ ते दुपारी २. ५६ मिनिटांपर्यंत

Leave a Comment