अधिक मासातले प्रदोषाचे व्रत! मुहूर्त, अशी करा पूजा

मित्रांनो, सध्या अधिक श्रावण सुरू आहे. याच अधिक श्रावणात येणारा प्रदोष ३० जुलै २०२३ रोजी येणार आहे. या दिवशी रविवार असल्याने या प्रदोषाला रवि प्रदोष असंही संबोधलं जाईल. प्रदोष काळात भगवान शिवशंकराची पूजा केली जाते.

दिवस आणि रात्र यांच्या मधल्या काळात ही पूजा संपन्न होत असल्याने या काळाला प्रदोष काळ असं म्हणतात. श्रावण महिना आणि त्यात भगवान शंकराची प्रदोष कालात केली जाणारी पूजा भाविकांच्या दृष्टीने अत्यंत उत्तम काळ असणार आहे. अशात रविवारीही शिवमंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळेल. येत्या ३० जुलै २०२३ रोजीचे प्रदोष काळाचे शुभ मुहूर्त कोणते आहेत ते आपण पाहूया.

अधिक मासाची तिथी ३० जुलै रोजी सकाळी ११.४६ वाजता सुरू होईल. ३१ जुलै २०२३ च्या सकाळी ०८.२५ वाजेपर्यंत प्रदोष काळ राहील. मात्र शिवपूजेचा शुभ मुहूर्त ३० जुलै २०२३ च्या संध्याकाळी ०७.१५ ते रात्री ०९.२० पर्यंत असेल.

सकाळी लवकर उठल्यानंतर आंघळ करुन तुम्ही या व्रताचा संकल्प करू शकता. हे व्रत निर्जळी करावं असा नियम आहे. मात्र तुम्ही निर्जळी व्रत करू शकत नसाल तर पाणी पिऊ शकता.

दिवसभर सात्विक नियमांचे पालन करा आणि वर उल्लेख केलेल्या मुहूर्तावर संध्याकाळी भगवान शंकराची पूजा करा. सर्व प्रथम, भगवान शंकरासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि हार आणि फुले अर्पण करा.

यानंतर भगवान शिवाला बिल्वपत्र, गंगाजल, अबीर, तांदूळ इत्यादी अर्पण करा. पूजा करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. आपल्या इच्छेनुसार भगवंताला नैवेद्य अर्पण करा आणि शेवटी आरती करा.

Leave a Comment