त्वचेवर येणाऱ्या पुटकुळ्या आणि फोड यांवर लागलीच उपचार करावे लागतात. नाही तर त्यामुळे चेहऱ्यावर व्रण पडतात आणि ते दीर्घ काळ टिकतात. त्यासाठी काही घरगुती गोष्टींपासून काही फेसपॅक तयार करून त्यांचा वापर केल्यास चेहऱ्यावरची मुरमं, पुटकुळ्या जाऊ शकतात.
बेसन किंवा चणा डाळीचं पीठ घराघरांत उपलब्ध असतं. त्याचा वापर पूर्वापार आपल्या सौंदर्यप्रसाधनांसाठी केला जातो. लहान बाळांनाही बेसन पीठात दूध व हळद घालून ते साबण म्हणून लावलं जातं. याच बेसनापासून एक फेसपॅक तयार करता येतो. एका वाटीत एक चमचा बेसन पीठ घेऊन त्यात थोडं पाणी मिसळा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. थोड्या वेळानं धुऊन टाका. यामुळे चेहऱ्यावर चमक येईल. बेसन पीठ स्क्रबरसारखंही काम करतं.
हळद आरोग्यासाठी गुणकारी असते. हळदीमुळे जखमा भरून येतात, त्यात संसर्ग होत नाहीत. त्यामुळे चेहऱ्यावरची मुरमं, त्यांचे व्रण व जखमा यांसाठीही हळद चांगलं काम करते. हळदीने कांती सुधारते. हळदीपासून फेसपॅक बनवण्यासाठी अर्धा चमचा हळद घेऊन त्यात एक चमचा मध घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. 5 मिनिटांनी चेहरा धुवा. या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरचे डाग कमी होण्यास मदत होईल.
मुलतानी माती चेहऱ्यासाठी उपयुक्त असते. ही माती चेहऱ्याच्या त्वचेवरचं अतिरिक्त तेल शोषून घेते. दीड चमचा मुलतानी मातीमध्ये पाणी, किंवा गुलाबपाणी घालून त्याची पेस्ट बनवा. हे मिश्रण आठवड्यातून 2 वेळा चेहऱ्याला लावा. वाळल्यावर धुऊन टाका. यामुळे चेहऱ्यावरचं तेल कमी होऊन मुरमंही कमी होतील. मुलतानी मातीचा उपयोग नैसर्गिक सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो.
बदाम खाल्ल्याने अनेक पोषणमूल्यं मिळतात. बुद्धी आणि केसांसाठी बदाम उपयुक्त असतात, तसेच ते चेहऱ्याच्या त्वचेसाठीही फायदेशीर असतात. बदाम आणि संत्रं एकत्र वाटून घ्या. हे मिश्रण अर्धा तास चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा धुवा. यामुळे मुरमं, पुटकुळ्यांचे डाग कमी होतील आणि चेहरा तजेलदार दिसेल.