Saturday, September 30, 2023
Homeआरोग्यपावसाळी पोटदुखीचा त्रास होतो तर मग असे करा उपाय!

पावसाळी पोटदुखीचा त्रास होतो तर मग असे करा उपाय!

पावसाळा म्हटला की, आल्हाददायक प्रसन्न वातावरण, चोहोबाजूला निसर्गाचे नवे रूप असे काहीसे चित्र आपल्यासमोर उभे राहते. मात्र, पाऊस काही आजारही सोबत घेऊन येतो. त्याला सर्वसाधारण भाषेत आपण पावसाळी आजार असे म्हणतो.

कारण पावसात या आजाराचे प्रमाण वाढलेले आढळून येते. पावसाळ्यात विशेष करून डासांशी संबंधित आजारांमध्ये ज्या प्रमाणात वाढ होते तशीच पोटाच्या विकारात मोठ्या संख्येने वाढ होत असते. त्यामध्ये प्रामुख्याने गॅस्ट्रो आजाराचा त्रास होण्याची अधिक शक्यता असते.

हा आजार उघड्यावरचे खाद्यपदार्थ आणि दूषित पाण्यातून झालेला संसर्ग यामुळे होतो. पावसाळ्यात भेडसावणारा हा आजार कुणाला झाला तर त्या रुग्णाची अवस्था बिकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळी पोटदुखीपासून वेळीच सावध राहण्याची गरज आहे.पोटाच्या विकारांमध्ये विशेष करून अपचन होणे, जुलाब, उलट्या, मळमळ होणे, पोटफुगी, तसेच खाण्याची इच्छा न होणे यासारखे प्रकार पावसाळ्यात होतात. त्यामुळे रस्त्यावरचे पदार्थ खाऊ नये किंवा कोणतेही रस्त्यावरचे ज्यूस पिऊ नये. कारण त्यात दूषित पाणी असल्यास त्यामधील सूक्ष्म जंतू पोटात जाऊन पचनक्रियेत बिघाड निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो गरम पदार्थ खावेत, थंड पदार्थ टाळावेत. रस्त्यावर, उघड्यावर मिळणारे हिरवी चटणी लावलेले सँडविच, पाणीपुरी यासारखे खाणे टाळावे. पावसाळ्यात शक्यतो बाहेरचे खाणे टाळावे.

अनेक वेळा आमच्याकडे आलेल्या रुग्णांमध्ये ई-कोलाय नावाचे जिवाणू पोटात आढळून आल्याचे दिसून येत असते. दूषित पाण्यामध्ये हा जिवाणू आढळून येत असतो. या जिवाणूने पोटात प्रवेश केल्यानंतर पोटाचे कार्य बिघडवून विविध पोटविकारांना आमंत्रण देत असतो. अशा विकाराच्या आजारांवरील उपचारासाठी काही काळ अँटिबायोटिक्स घ्यावी लागतात. पावसाळ्यात कावीळ होण्याची शक्यता असते. त्यामध्ये हिपेटायटिस ए आणि ई ही कावीळ दूषित पाणी शरीरात गेल्यामुळे होते.

वॉशरूममधून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजे. जेवण योग्य पद्धतीने शिजवून घ्यावे आणि चांगल्या पद्धतीने साठवून ठेवावे. घरचे ताजे अन्न खावे. संतुलित आहार घ्यावा. व्यायाम करावा, सोबत योग केला पाहिजे. त्यामुळे आतड्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.तणावाचा परिणामसुद्धा शरीरातील पचनसंस्थेवर होत असतो. पोटविकाराच्या व्याधी उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वतःच्या मनाने कोणतीही औषधी घेऊ नये.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन