आषाढी एकादशी पासून ‘या’ राशीना अच्छे दिन! १२ राशींचे मासिक भविष्य

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या वेगाने दर महिन्याला आपले स्थान बदलत असतो. शनी, राहू, केतू सारखे ग्रह हे संथ गतीने प्रवास करत असले तरी ते ज्या राशीत स्थित आहेत तिथे त्यांचे वक्री होणे, उदय स्थिती, अस्त होण्याची अवस्था यामुळे सुद्धा १२ राशींवर शुभ-अशुभ प्रभाव दिसून येऊ शकतो.

अवघ्या काही दिवसात सुरु होणाऱ्या जुलै महिन्यात शुक्र, बुध, सूर्य अशा तीन ग्रहांचे गोचर होणार आहे. येत्या आषाढी एकादशीचा शुभ प्रभाव सुद्धा जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात काही राशींना लाभदायक ठरू शकतो. ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे यांच्याकडून जुलै महिन्याचे १२ राशींचे भविष्य जाणून घेऊया.

मेष रास
शनी मंगळाचा प्रतियोग धरसोड वृत्तीला खतपाणी घालणारा योग आहे. परंतु यामुळे हातची संधी हुकवून चालणार नाही. विचारांना शिस्त लावावी. वेळेचा अपव्यय महागात पडेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणे एकाग्रतेने काम करावे. अतिरिक्त आत्मविश्वास उपयोगाचा नाही. संतान प्राप्तीसाठी जरूर प्रयत्न करावेत. वैद्यकीय सल्ला आणि उपाय कामी येतील. महत्वाच्या कागदपत्रांची विशेष काळजी घ्यावी. हलगर्जीपणा नको. कोर्टकचेरीची कामे हळूहळू मार्गी लागतील. पण पाठपुरावा सोडू नका.

वृषभ रास
शनी साहाय्यकारी असल्याने मेहनत, सातत्य आणि चिकाटी ठेवलीत तर नक्कीच लाभदायक होईल. सत्याचा मार्ग सोडू नका. विद्यार्थीवर्गाने वेळेचे उत्तम नियोजन करणे अतिशय आवश्यक असेल. अन्यथा मेहनत वाया जाईल. गुरुबल कमजोर असल्याने सुरुवातीपासूनच ध्येय निश्चित करा. शनी बुधाचा शुभ योग कामकाजात नियोजनबद्धता देईल. त्यात सातत्य राखणे मात्र आपली जबाबदारी आहे. कुटुंबात , जोडीदारासह वाद निर्माण होतील. शब्दाने शब्द न वाढवणे हिताचे ठरेल. कफदोष बळावेल.

मिथुन रास
आपल्या राशीतील रवी बुधाचा योग आपली बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व यांचे योग्य सादरीकरण करण्यासाठी पूरक आहे. स्वतःचे विचार चांगल्या प्रकारे व्यक्त केल्याने आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवाल. नोकरी व्यवसायात लाभदायक घटना घडतील. शुक्र मंगळाचा शुभ योग आवश्यक इतका आत्मविश्वास देईल. आर्थिक समस्या दूर होतील. विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळेल. जोडीदारासह खटके उडले तरी त्यांचे वादात रूपांतर होणार नाही. सामंजस्याने परिस्थिती हाताळाल. खांदे, दंड दुखावणे, मार लागणे संभवते.

कर्क रास
गुरू शुक्राचा शुभ योग हा कामातील प्रगती आणि आर्थिक उन्नती यांचा द्योतक आहे. मेहनतीचे फळ मिळाल्याने समाधान वाटेल. लहान मोठे प्रवास आनंददायी होतील. संतती प्राप्तीसाठी वैद्यकीय उपचार सुरू ठेवावेत. जोडीदाराच्या विचारांना कृतीची जोड द्याल. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने केलेली आर्थिक उलाढाल लाभकारक ठरेल. विद्यार्थी वर्गाला गुरुजनांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. प्रश्न सुटतील. कौटुंबिक सौख्य संमिश्र असेल. वातावरणातील बदलामुळे कफ, खोकला संभवतो.

सिंह रास
गुरू शुक्राचा शुभ योग हा कामातील प्रगती आणि आर्थिक उन्नती यांचा द्योतक आहे. मेहनतीचे फळ मिळाल्याने समाधान वाटेल. लहान मोठे प्रवास आनंददायी होतील. संतती प्राप्तीसाठी वैद्यकीय उपचार सुरू ठेवावेत. जोडीदाराच्या विचारांना कृतीची जोड द्याल. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने केलेली आर्थिक उलाढाल लाभकारक ठरेल. विद्यार्थी वर्गाला गुरुजनांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. प्रश्न सुटतील. कौटुंबिक सौख्य संमिश्र असेल. वातावरणातील बदलामुळे कफ, खोकला संभवतो.

कन्या रास
अष्टमातील राहू, हर्षलसह गुरुचे भ्रमण वैचारीक अस्थैर्य देईल. निश्चयापासून ढळू नका. कसोटीची वेळ आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. सभोवतालची प्रलोभने आपले मन विचलित करतील. सावध राहाल तरच वाचाल. अन्यथा लोभाच्या भोवऱ्यात फसाल. प्रेमवीरांनी सावधगिरी बाळगावी. रवी बुधाच्या आधाराने विवेकबुद्धी प्रयत्नपूर्वक जागरूक ठेवलीत तरच धोका टळेल. नोकरी व्यवसायात स्थैर्य राखता येईल. विद्यार्थी वर्गाने मेहनत आणि सातत्य यांना अधिक प्राधान्य द्यावे. पाठ, मणका आणि पोट यांचे आरोग्य जपावे.

तूळ रास
भाग्य आणि दशम स्थानातील रवी, बुधाचे भ्रमण विशेष लाभकारक ठरेल. गुरुबल चांगले आहेच. नोकरी व्यवसायात मोठी झेप घ्याल. त्यात आर्थिकदृष्ट्या चांगला लाभ होण्याचे योग आहेत. विद्यार्थी वर्गाला मेहनतीचे फळ उत्तम मिळेल. जोडीदाराच्या समस्या सोडवताना नातेवाईकांची मदत होईल. खांदे भरून येणे, मान आखडणे असे त्रास संभवतील. गुंतवणूकदारांना कमीतकमी तोटा सहन करावा लागेल. चिंता नसावी. विवाहोत्सुक मंडळींनी जोडीदाराचे संशोधन सुरू ठेवावे.

वृश्चिक रास
एकंदरीत ग्रहमान स्थैर्य देणारे आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल नको. धीर आणि सामंजस्य कामी येईल. नोकरी व्यवसायात महिन्याच्या अखेरीस आर्थिक लाभ होतील. शुभ वार्ता समजतील. विद्यार्थीवर्गाने कायम जागरूक राहावे. चिकाटी गरजेची ! स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी शोधकार्य सुरू ठेवावे. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात नाव गाजवेल. सहकारी वर्गाची साथ सोबत उत्तम मिळेल. कामाचा ताण वाढेल. पाठ, मणका भरून येणे व पित्तविकार बळावतील. वातावरणातील बदलानुसार आहारात बदल करावा.

धनु रास
प्रवास योग चांगला आहे. कामानिमित्त केलेला प्रवास लाभदायक ठरेल. स्वतःच्या हिमतीने नवी, चांगली नोकरी मिळवण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थी वर्गाला नव्या शैक्षणिक वर्षात उत्तम यश मिळेल. विवाहोत्सुक मंडळींचे संशोधनकार्य पूर्णत्वास जाईल. जोडीदाराच्या बौद्धिक , वैचारिक पातळीचा सन्मान होईल. नोकरी व्यवसायात बारकाईने लक्ष घालावे. आपल्यातील उणिवा भरून काढाव्यात. संतती प्राप्तीचे योग अत्यंत बलवान आहेत. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी अधिक होईल. सावधान!

मकर रास
आर्थिकदृष्ट्या ग्रहमान ठीक आहे. धनसंपत्ती स्थिर राहील. नोकरीमध्ये सहकारी वर्ग मदतीचा हात पुढे करेल. व्यावसायिकांनी मोठी जोखीम पत्करू नये. नव्या संकल्पना सध्या तरी बांधूनच ठेवाव्यात. विद्यार्थी वर्गाचा आलेख प्रगतिकारक असेल. जोडीदार आपल्या बौद्धिक बळावर यशाचे शिखर गाठेल. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी ज्येष्ठ मंडळींची मदत होईल. वैचारिक ताणताणावामुळे डोकेदुखी वाढेल.

कुंभ रास
परदेशगमन योग आहे. शिक्षणासाठी किंवा कामानिमित्त परदेशवारी कराल. नोकरीतील कामात प्रगती होईल. जबाबदाऱ्या वाढतील. ताण घेऊ नका. एकेक कामे हातावेगळी कराल. व्यवसायात संवाद वाढवल्याने महत्वाची कामे मार्गी लागतील. विद्यार्थी वर्गाच्या मेहनतीला यश मिळेल. जोडीदाराला त्याच्या कामात नवी आव्हाने स्वीकारावी लागतील. विवाहोत्सुक मंडळींचा विवाह जुळेल. चिंता, काळजी करू नका.

मीन रास
शनीची चिकाटी, बुधाची व्यावहारिक बुद्धी आणि मंगळाचे धाडस यांचा उपयोग आपली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी होईल. नोकरीतील वरिष्ठ मंडळींना आपली मते पटवून द्याल. व्यवसायात चतुराईने वागल्यास भरपूर लाभ होईल. गुंतवणूकदारांना हा महिना लाभकारक ठरेल. विद्यार्थी वर्गाने गाफील राहू नका. सतर्क राहा. जोडीदारासह प्रेमाचे संबंध बहरतील. विवाहोत्सुक मंडळींची नवी नाती जुळतील. युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment