मित्रानो, या सप्ताहात बुधाचा राशीपालट आहे. ग्रहस्थिती अशी- गुरु, राहू आणि हर्षल मेषेत, शुक्र कन्येत, रवी, मंगळ, केतू आणि बुध तूळ राशीत, ६ नोव्हेंबरपासून बुध वृश्चिक राशीत, प्लूटो मकरेत, शनी कुंभेत, तर नेपच्यून मीन राशीत आहे.
चंद्राचे भ्रमण कर्क, सिंह, कन्या आणि तूळ राशीतून राहील. या सप्ताहात ९ नोव्हेंबर रोजी रमा एकादशी आणि वसुबारस आहे. १० नोव्हेंबर रोजी प्रदोष आणि धनत्रयोदशी आहे. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी आश्विन कृष्ण अष्टमी आहे.
दिवाळीचा आठवडा आहे. देशभरात आनंदाचे, उत्सवाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे. या आठवड्यातील ग्रहस्थिती पाहता कोणत्या राशींना दिवाळीचा काळ अतिशय उत्तम, लाभदायक, धन-धान्य, सुख-समृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा वृद्धी करणारा ठरू शकेल, कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी, ते जाणून घेऊया…
मेष: घरकामात खूपच व्यस्त राहाल. विवाहित व्यक्ती सुटकेचा श्वास घेतील. काही वैचारिक मतभेद होऊ शकतात. सध्या काही घरगुती खर्च होतील. कामात समतोल साधण्याचा प्रयत्न कराल. उत्तमरित्या गोष्टी हाताळाव्या लागतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. परिश्रम करतच राहाल. व्यापाऱ्यांना समस्या कमी झाल्याने दिलासा मिळेल. व्यवसायात नवीन उर्जेसह वाटचाल करतील.
सरकारी धोरणांची अंमलबजावणी करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. विरोधकांपासून सतर्क राहा. विद्यार्थ्यांना मेहनत वाढवावी लागेल. आत्ता केलेल्या मेहनतीचा त्यांना चांगला फायदा होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खाण्या – पिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.
वृषभ: हा आठवडा खूपच चांगला आहे. असे असले तरी विवाहितांचा आठवडा वैवाहिक जीवनातील भांडणात जाऊ शकतो, तेव्हा सावध राहावे. मित्रांसह मौजमजा करण्यास जाऊ शकता. काही नवीन लोकांच्या भेटीगाठी झाल्याने मित्र मंडळ वाढेल. मनात धार्मिक विचार येतील. लोकांची मदत कराल. विरोधकांवर मात कराल. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे.
परिश्रम यशदायी ठरतील. व्यापाऱ्यांना दूरवरच्या क्षेत्रांशी व राज्यांशी किंवा परदेशाशी संपर्क साधून व्यवसाय वाढविण्यात यश प्राप्त होईल. खूप कष्ट करावे लागतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल. स्पर्धेत यश संभवते. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मिथुन: हा आठवडा अनुकूल आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात अत्यंत व्यस्त राहाल. वैवाहिक जीवनासाठी आठवडा खूपच चांगला आहे. वैवाहिक जोडीदारामुळे आपणास खूप मोठा फायदा होऊ शकतो. व्यापाऱ्यांना व्यवसायात चोहोबाजूने पाठिंबा मिळाल्याने व्यवसाय वृद्धी होईल. प्राप्ती उत्तम होईल. विविध स्रोतातून लाभ होईल. नशिबाची साथ मिळून कामे होतील. नोकरीच्या ठिकाणी आपणास थोडे सावध राहावे लागेल. मनात वेगवेगळे विचार करण्याऐवजी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. आहारावर नियंत्रण ठेवावे.
कर्क: हा आठवडा चांगला आहे. मित्रांशी उत्तम संबंध राहतील. वैवाहिक जीवनातील तणाव निवळेल. आत्मविश्वास उत्तम असल्याने कामात यश प्राप्त होईल. एखाद्या सरकारी निविदेसाठी अर्ज केल्याने आपणास मोठा फायदा होऊ शकतो. शेअर बाजारात किंवा बांधकाम व्यवसायात काम करणे फायदेशीर होऊ शकते.
खूप पैसे कमावू शकाल. नोकरीच्या दृष्टीने आठवडा अनुकूल आहे. आत्मविश्वास व अनुभव यशाचा मार्ग निर्माण करेल. वरिष्ठ खुश असल्याचे दिसून येईल. आव्हानांचा सामना करत असल्याचे बघून ते कौशल्याची पारख करतील. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एकांताची गरज भासेल. त्याकडे लक्ष द्यावे. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल.
सिंह: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. खर्चात वाढ होईल. कुटुंबियांशी असलेल्या समन्वयात काहीसा बिघाड होऊ शकतो. घरात एखादा सोहळा संभवतो, त्यामुळे खूप लोकांची ये-जा होईल. असे असले तरी भावंडांशी काही मतभेद संभवतात. शासकीय लाभ संभवतात. शत्रू धारातीर्थी पडतील. एकतर्फी विजय प्राप्त होईल.
एखाद्या निवडणुकीसाठी उभे राहिलात तर आपणास विजयाची चांगली संधी मिळू शकते. नोकरीसाठी आठवडा अनुकूल आहे. परिश्रम करत राहा. कामावर जास्त लक्ष द्या. व्यापारी कामात खूप परिश्रम करतील. असे असले तरी त्यांनी अधूनमधून थोडी विश्रांती घेऊन चांगले भोजन करावे. टेक्निकल व मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. ते उत्तम कामगिरी करू शकतील.
कन्या: हा आठवडा अनुकूल आहे. आत्मविश्वास चांगला असल्याने कार्यात यश प्राप्त होईल. एकीकडे असे वाटेल की भौतिक जगापासून विरक्त व्हावे, तर दुसरीकडे सर्व भौतिक सुखांची कामना होऊ लागेल. अशा प्रकारे आपल्या मनात एक अंतर्द्वंद्व होऊ लागेल, जे आपल्या मित्रांना प्रभावित करू शकेल. प्राप्ती सामान्यच राहील. बँकेतील शिल्लक वाढत असल्याचे दिसून येईल.
खर्चात कपात होईल. आर्थिकदृष्ट्या आठवडा अनुकूल राहील. नोकरीच्या ठिकाणी स्थिती मजबूत राहील. कामगिरीने तसेच वरिष्ठांपासून समाधानी असल्याचे दिसून येईल. व्यापारात काही नवीन सौदा होऊ शकतो. त्यामुळे आत्मविश्वास उंचावेल. विद्यार्थी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. त्याचे यथोचित फळ प्राप्त होईल.