पितृपक्षात ‘या’ जीवांना रिकाम्या पोटी पाठवू नका! पूर्वजांना अन्नदान केल्याचे लाभू शकते पुण्य

मित्रानो, २०२३ मध्ये पितृ पक्ष शुक्रवार, २९ सप्टेंबर २०२३ रोजी सुरू झाला आहे. पितृ पक्षाची समाप्ती १४ ऑक्टोबर २०२३ रोजी कृष्ण पक्षाच्या अमावस्येला होईल. याच दिवशी सर्वपित्री अमावस्या असणार आहे. पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीनुसार श्राद्ध व पिंडदान केले जाते. यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती व मोक्षप्राप्तीला गती मिळते असे मानले जाते. याशिवाय आपल्या वाडवडिलांची आठवण काढण्यासाठी सुद्धा हा दिवस असतो.

आपल्याकडे पितृ पक्षात कावळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असं म्हणतात की, कावळ्याच्या रूपात आपले पूर्वजच भूतलावर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. पण धार्मिक मान्यतांनुसार केवळ कावळाच नाही तर अन्यही काही रूपांमध्ये आपले पूर्वज आशीर्वाद देत असतात. अशावेळी पिंडदान झाल्यावर कावळ्यासह या पाच जीवांना सुद्धा अन्नदान करणे शुभ मानले जाते.

गायीला हिंदू धर्मात मातृत्वाचं प्रतीक मानलं जातं. सृष्टीच्या पंचतत्वांपैकी पृथ्वी तत्व हे गायीच्या ठायी वसलेले असते असं म्हणतात. शिवाय गायीच्या ३३ कोटी देवतांचा वास असल्याचं सुद्धा मानलं जातं त्यामुळेच गायीला सुद्धा अन्न देणं हे शुभ मानलं जातं.

कावळा हा वायुतत्वाशी संबंधित जीव आहे असं म्हणतात. धार्मिक कथांनुसार, ज्याप्रमाणे माणसांना उजेडात पाहण्याची दृष्टी आहे, वटवाघूळ व घुबडाला अंधारात पाहण्याची दृष्टी आहे तसेच कावळ्याला जीवात्मा पाहण्याचे वरदान लाभले आहे. त्यामुळे कावळे दारात येणे हे संकेत मानले जातात.

कुत्रा हा रक्षक मानला जातो. शिवाय कुत्रा हा यमाचा दूत आहे, असेही समजले जाते. त्यामुळे पितृपक्षात किंवा अन्यही वेळी जर एखादा भुकेला- तहानलेला कुत्रा तुमच्या दाराशी आला तर त्याला रिकाम्या पोटी पाठवू नये असं म्हणतात. शक्य असल्यास त्याला भोजन द्यावे. पण कुत्र्यांना काठीने मारण्याची किंवा शिळे खराब झालेले अन्न देण्याची चूक करू नये.

देवतांना नैवेद्य अर्पण करताना आपण मानवाला विसरता कामा नये. कारण मानवाची निर्मितीच पंचतत्वातून झालेली आहे. तुमच्या दाराशी एखादा गरजू आल्यास यथाशक्ती त्याला मदत करू शकता.असं म्हणतात की, मुंगी ही अग्नितत्वाचे प्रतीक आहे. त्यामुळे मुंग्यांना अन्नदान करणे सुद्धा शुभ मानले जाते.

Leave a Comment