इचलकरंजी महापालिका, महावितरण, पोलिसांकडून अनंत चतुर्थीसाठी जोरदार तयारी: खड्डे, चरी, मुरूम टाकून मुजविले,विद्युत तारांचा अडथळा दूर

ताजी बातमी टिम:

उद्याच्या अनंत चतुर्थीचे गणेश विसर्जन विनाविघ्न पार पडावे यासाठी महानगरपालिका प्रशासन, महावितरण आणि पोलिस प्रशासन युद्ध पातळीवर तयारीला लागले आहेत. इचलकरंजी शहरातील विसर्जन मार्गावरील तसेच विविध भागातील कामाची तयारी पाहता शहरवासिय व कार्यकर्त्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

गेल्या काही वर्षापासून शहर परिसरात विविध सार्वजनिक मंडळांकडून भव्यदिव्य मुर्त्यांची प्रतिष्ठापना करताना दिसून येत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर पोलिस दलाच्यावतीने आयोजित केलेल्या बैठकीत उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी शहरातील विविध रस्त्यावर पडलेले खड्डे, चरी, लोंबकळणाऱ्या विद्युत तारा सुस्थितीत कराव्यात, शहरातील साफसफाई, विविध चौकातील सुशोभिकरण आदि बाबींवर लक्ष देवून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली होती.

विविध मागण्यांच्या पार्श्वभुमीवर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील विविध भागांसह मिरवणुक मार्गातील खड्डे, चरी, मुरूम टाकून तसेच डांबरीकरण करून मुजविले आहेत. तर विविध चौकांची रंगरंगोटी व साफसफाई करण्याचे काम सुरू आहे. तसेच मिरवणुकी मार्गावरील साफसफाईला जोर देण्यात आला आहे.
महावितरणच्यावतीने शहरातील प्रमुख मार्गासह विसर्जन मार्गावर गणेश विसर्जनमार्गात विद्युत तारांचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी युद्धपातळीवर तारा बदलण्याचे काम सुरू आहे. तसेच पोलिस खात्याच्यावतीनेही विसर्जन मार्गात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात
येणार आहे.

Leave a Comment