वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ३० ते ३१ दिवसांच्या अंतराने ग्रह आपली चाल बदलून राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करत असतात. काही संथ गतीने चालणारे ग्रह किंवा राहू- केतू सारखे पापग्रह परिवर्तन करत नसले तरी त्यांच्या मार्गी, वक्री, उदय, अस्त होण्याने राशीचक्रातील राशींवर कमी अधिक प्रभाव दिसून येत असतो.
अशाच प्रकारे आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच तब्बल ५ ग्रहांचे गोचर होणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला गुरू मेष राशीत वक्री होईल. तर ४ सप्टेंबर रोजी शुक्र कर्क राशीत मार्गी होणार आहे. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी बुध सिंह राशीत मार्गी होईल तर १७ सप्टेंबरला सूर्य कन्या राशीत गोचर करणार आहे. यानंतर सगळ्यात शेवटी मंगळ कन्या राशीत अस्त होणार आहे. यानुसार १ ते ३० सप्टेंबर या महिन्याभराच्या कालावधीत कोणत्या राशीवर कसा प्रभाव असणार हे जाणून घेऊया.
मेष रास
वाहन खरेदीचे चांगले योग आहेत. वैयक्तिक आवडीनिवडी जपण्यासाठी खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरी व्यवसायात मनाविरुद्ध घटना घडतील.
त्रागा न करता त्यामागची कारणमीमांसा जाणून घ्यावी. सतत तणावाखाली राहणे आरोग्यदृष्ट्या चांगले नाही. रक्तदाबावर नियंत्रण ठेवावे. संततीप्राप्तीचे प्रयत्न यशस्वी ठरतील. विवाह जमण्यास अनुकूल कालावधी आहे. परदेशासंबंधित करार होतील. गृहसौख्य मिळेल. प्रियजनांच्या भेटीगाठी झाल्याने उत्साह वाढेल. वरिष्ठांकडून साहाय्य मिळेल. नव्या संलग्न क्षेत्रातही काम करण्याचा विचार कराल.
वृषभ रास
तृतीय स्थानातील कर्क राशीतील शुक्र स्वतःच्या आवडीनिवडी जपण्यास, छंद जोपासण्यास वेळ देईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मुलांची त्यांच्या कामात , शिक्षणात प्रगती होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह वाद घालू नका. काही महत्वाच्या संधी निसटून जातील. पण खचून जाऊ नका. धीराने घ्यावे. विद्यार्थी वर्गाला त्यांच्या मेहनतीचे आणि सातत्याचे फळ मिळेल. न टाळता येणारे खर्च पुढे उभे राहतील. जखम झाल्यास त्यात पू होईल. जखम चिखळण्याची शक्यता आहे. योग्य काळजी घ्यावी.
मिथुन रास
आपली विवेक बुद्धी जागरूक ठेऊन नात्याची वीण घट्ट करा. कौटुंबिक वातावरण काहीसे तप्त वा त्रस्त असेल. धीराने आणि सबुरीने घ्यावे. प्रश्न अलगद सोडवावे लागतील. स्थावर मालमत्तेच्या खरेदी विक्री संबंधित बोलणी सुरू होतील. घाई करू नका. नोकरी व्यवसायात नवे करार करताना छुपे मुद्दे विशेष करून अभ्यासवेत. विद्यार्थी वर्गाला गुरू शनीची साथ लाख मोलाची ठरेल. आत्मविश्वासपूर्वक आगेकूच करावी. सातत्याने घेतलेले कष्ट फळास येतील. हाडे आणि स्नायूंसंबंधीत त्रास सहन करावा लागेल.
कर्क रास
धन स्थानातील रवी बुध योग ‘उत्पन्न आणि खर्चाचे योग्य गणित मांडण्याची गरज आहे’ असे सूचित करत आहे. मोठेपणा मिरवण्यासाठी खर्च कराल तर अंगाशी येईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींची विशेष काळजी घ्यावी लागेल. त्यांचे मन राखणे गरजेचे आहे. विद्यार्थी वर्गाला अभ्यासावर अधिक जोर लावावा लागेल. कष्ट घ्याल तरच मेवा खाल. काही मुद्द्यांवरून जोडीदारासह वाद होतील. शब्द जपून वापरावेत. अन्यथा प्रकरण विकोपाला जाईल. कामाचे ठिकाण आणि घर यात समतोल साधणे गरजेचे आहे.