उद्या रक्षाबंधन: राखी कशी बांधावी? कोणता मंत्र म्हणावा? शास्त्रशुद्ध पद्धत, शुभ मुहूर्त जाणून घ्या

मित्रानो, मराठी वर्षातील महत्त्वाचा तसेच देशभरात साजरा केला जाणारा सण म्हणजे रक्षाबंधन. श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. याच दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा होतो. याला राखीपौर्णिमा असेही म्हटले जाते. ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचे बंधन.

या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावर राखी बांधते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असल्याचे मानले जाते. विधिवत, शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते.

रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते, अशी मान्यता आहे. रक्षाबंधनदिनी भावाला राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती? विधिवत रक्षाबंधन करताना कोणते मंत्र म्हणावेत? जाणून घेऊया.

महाभारत काळातही रक्षाबंधनाचे अनन्य साधारण महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. बहीण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही, तर सर्व महिलांच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते. तसेच बाह्य शत्रू आणि अंतर्विकारांवर आपला भाऊ विजय प्राप्त करो किंवा सुरक्षित राहो, ही भावनाही त्यात असते. भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवतो, असे सांगितले जाते.

यंदा रक्षाबंधन सण कधी साजरा करायचा? बुधवारी ३० ऑगस्टला की गुरुवारी ३१ ऑगस्टला? याविषयी संभ्रम असल्याचे म्हटले जाते.

मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल तो भद्रा करण असताना केला जात नाही. ३० ऑगस्ट रोजी सकाळी १०.५८ ते रात्री ९.०२ भद्रा करण आहे. महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. त्यामुळे संपूर्ण दिवसात कधीही राखी बांधली तरी चालेल. बुधवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी श्रावण पौर्णिमेचा प्रारंभ होत आहे. गुरुवार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजून ०५ मिनिटांनी श्रावण पौर्णिमा समाप्त होत आहे.

शास्त्रनियमाप्रमाणे बुधवारी ३० ऑगस्ट रोजीच रक्षाबंधन सण साजरा करायचा आहे. शास्त्रनियम असा आहे की, सूर्योदयापासून ६ घटिकांपेक्षा जास्त व्यापिनी अशा श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अपरान्हकाली किंवा प्रदोषकाली रक्षाबंधन करावयाचे आहे. तशी स्थिती बुधवारी ३० ऑगस्ट रोजीच आहे. म्हणून सर्वांनी बुधवार ३० ऑगस्ट रोजीच रक्षाबंधन सण साजरा करावा, असे सांगितले जाते.

रक्षाबंधनाच्या दिवशी सकाली स्नानादी कार्ये उरकून शुचिर्भूत व्हावे. घरातील देवतांना दंडवत घालावा. आराध्य देवता, कुलदेवता यांचे नामस्मरण करावे. नमस्कार करून त्यांचे शुभाशिर्वाद घ्यावेत. एका ताटात किंवा ताम्हनात राखी, अक्षता, कुंकू घ्यावे. अक्षता या पाण्यात थोड्या ओल्या करून घ्याव्यात. निरांजनही तयार करावे.

राखीचे साहित्य असलेले हे ताट किंवा ताम्हण देवघरात नेऊन बाळकृष्णाला किंवा आपल्या आराध्य देवतेला एक राखी अर्पण करावी. रक्षाबंधनाचा विधी सुरू असताना भावाचे सुमुख पूर्व दिशेला असावे. यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात, असे सांगितले जाते.

राखी बांधताना भावाने टोपी, फेटा, पगडी काहीतरी डोक्याला बांधावे. यापैकी काहीच उपलब्ध नसल्यास रुमाल बांधावा. – रक्षाबंधनाच्या विधीत बहिणीने प्रथम भावाच्या ललाटावर पिंजर वा कुंकू लावावे. कुमकुम तिलक लावल्यानंतर अक्षता लावाव्यात. यानंतर आशीर्वाद म्हणून अक्षता भावाच्या डोक्यावर टाकाव्यात.

या विधीनंतर भावाचे औक्षण करावे. औक्षण केल्यानंतर भावाच्या उजव्या हातावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधावी. रक्षाबंधन करताना शक्य असल्यास मंत्रोच्चार करावा. यामुळे राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो, असे मानले जाते.
रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा-बहिणींनी एकमेकांना मिठाई द्यावी.

भाऊ मोठा असेल, तर बहिणीने भावाला वाकून नमस्कार करावा आणि बहीण मोठी असल्यास भावाने बहिणीला वाकून नमस्कार करावा. रक्षाबंधन आटोपल्यावर भावाने वस्त्र, आभुषणे किंवा इच्छित भेटवस्तू बहिणीला देऊन तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करावी.

राखी बांधताना म्हणावयाचे मंत्र पुढीप्रमाणे
येन बद्धो बलि राजा, दानवेन्द्रो महाबल: तेन त्वाम् प्रतिबद्धनामि रक्षे माचल माचल:।

सिन्दूरं सौभाग्य वर्धनम, पवित्रम् पाप नाशनम्। आपदं हरते नित्यं, लक्ष्मीस्तिष्ठति सर्वदा॥, हा मंत्र टिळा लावताना म्हणावा.

Leave a Comment