पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात बरेच बदल होत असतात. अशावेळी अनेकांची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. ज्यामुळे फुफ्फुसांवर परीणाम होतो आणि छातीत कफ साचू लागतो. फुफ्फुसं आणि श्वासनलिकेत कफ जमा झाल्यानं खोकला होतो.
हर्बल औषध खोकल्यावर रामबाण उपाय ठरतात. आयुर्वेदीक वैद्य मिहिर खत्री यांनी सांगितले की, एक होममेड गोड औषध २ वर्षांच्या लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सगळेच घेऊ शकतात. यामुळे खोकल्यापासून त्वरीत आराम मिळेल.
प्रथम अडूळश्याची पाने पाण्याने धुवा. नंतर खलबत्त्यात व्यवस्थित वाटून घ्या. थोडं पाणी घाला जेणेकरून मिश्रण पातळ होईल. आता एक भांड्यात मध आणि वाटलेली पानं एकत्र करून खोकला झालेल्या व्यक्तीला १ चमचा द्या. या उपायानं वारंवार खोकला येणं, दमा, फ्लू आणि गळणाऱ्या नाकापासून आराम मिळतो, कफ बाहेर निघतात.
हळदीचे दूध प्यायल्यानेही आराम मिळतो. यासाठी एका ग्लास दुधात अर्धा चमचा हळद मिसळून रोज प्या. याशिवाय वाफ घेणे देखील खूप फायदेशीर आहे.
काळी मिरी आणि मधाच्या मिश्रणाने कोरडा खोकलाही बरा होतो. ४-५ काळी मिरी बारीक करून त्यात मध मिसळून खावे. हे आठवड्यातून दररोज हा उपाय करा. काही दिवसात तुम्हाला आराम मिळेल.
आलं कोरड्या खोकल्यावरही आराम देते. यासाठी आल्यात चिमूटभर मीठ मिसळा आणि दाढेखाली ठेवा. त्याचा रस हळूहळू तोंडात जाऊ द्या. 5 मिनिटे तोंडात ठेवा आणि नंतर चूळ भरून तोंड स्वच्छ धुवा.
लिंबामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात त्यामुळे संसर्गांशी लढण्यास मदत होते. दोन चमचे लिंबाच्या रसात एक चमचा मध मिसळून मिश्रण तयार करा आणि दिवसातून अनेक वेळा सेवन करा. खोकल्यापासून आराम मिळेल. खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी चिमूटभर मीठ आणि लिंबाच्या रसामध्ये थोडे मध मिसळून सेवन करणे देखील फायदेशीर ठरते.
बदाम आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. बदाम खाल्ल्याने खोकलाही दूर होतो. यासाठी 5-6 बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. आता हे भिजवलेले बदाम बारीक करून पेस्ट बनवा आणि त्यात एक चमचा तूप घाला. दिवसातून तीन ते चार वेळा या मिश्रणाचे सेवन करा.