मित्रांनो, ग्रहांचा गोचर कालावधी हा वेगवेगळा आहे. त्यामुळे कमी अधिक कालावधीमुळे एकापेक्षा जास्त ग्रह एकाच राशीत येतात. त्यात चंद्र हा वेगाने भ्रमण करणारा ग्रह असल्याने दर सव्वा दोन दिवसांनी युती आघाड्या होत असतात. काही शुभ तर काही अशुभ युती होतात. त्या त्या स्थितीनुसार राशीचक्रावर परिणाम होत असतो. आता चंद्र हा सिंह राशीत आला आहे. या राशीत मंगळ आणि शुक्र आधीच ठाण मांडून आहेत. त्यामुळे त्रिग्रही योग जुळून आला आहे. या त्रिग्रही योगाचा तीन राशीच्या जातकांना लाभ होणार आहे. सव्वा दोन दिवस कसे असतील ते जाणून घेऊयात.
20 जुलै 2023 सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी चंद्र कर्क राशीतून सिंह राशीत आला आहे. मंगळ ग्रहासोबत युतीमुळे लक्ष्मी योग, तर शुक्रासोबत युतीमुळे कलात्मक योग तयार झाला आहे. त्रिग्रही युती 22 जुलैला संपुष्टात येईल. कारण या दिवशी चंद्र सिंह राशीतून कन्या राशीत रात्री 11 वाजून 42 मिनिटांनी प्रवेश करेल.
मेष : त्रिग्रही योगामुळे या राशीच्या जातकांना तीन ग्रहांचं बळ मिळणार आहे. लक्ष्मी योग आणि कलात्मक योगामुळे या राशीच्या जातकांना अचानक धनलाभ होणार आहे. तसेच प्रगतीची नवी दारं खुली होतील. कामाच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल. तसेच त्यासाठी योग्य मोबदला देखील हाती पडेल. पण असं असताना लग्न भावात गुरु आणि राहुच्या युतीमुळे चांडाळ योग तयार झाला आहे विसरू नका. त्यामुळे बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. वाद होईल असं वागू नका.
मिथुन : या राशीच्या जातकांना त्रिग्रही योगाचा लाभ मिळणार आहे. या राशीच्या एकादश भावात तीन ग्रह एकत्र आले आहेत. त्यामुळे करिअर आणि व्यवसायात प्रगती दिसून येईल. जमीन किंवा घर खरेदीचा योग जुळून येईल. तसेच न्यायालयीन प्रकरणात अपेक्षित यश मिळेल. दुसरीकडे, मोठी आर्थिक गुंतवणूक करताना काळजी घ्या. दिवाळखोरीत जाल असं काही करू नका.
सिंह : या राशीच्या लग्नभावात चंद्र, मंगळ आणि शुक्राची युती होत आहे. यामुळे या राशीच्या जातकांच्या स्वभावात अचानक बदल झालेला दिसेल. आपल्या शब्दांना योग्य मान मिळतोय असं जाणवेल. तसेच आपली कामं झटपट होताना दिसतील. आपण बोलावं आणि पटकन काम व्हावं अशी स्थिती आहे. दुसरीकडे, इतरांची कामं पूर्ण करून देताना त्याची शहनिशा करून घ्या. उगाचच एखादी प्रकरण अंगलट येऊ शकतं.