जुलै महिना तुमच्या राशीसाठी कसा असेल?

जुलै महिन्यात काही ग्रहांची उलथापालथ होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम राशीचक्रावर होईल. मंगळ, बुध, शुक्र आणि सूर्य हे ग्रह राशी बदल करणार आहेत. दुसरीकडे, चंद्र हा सव्वा दोन दिवसांनी राशीबदल करत राहील. त्यामुळे शुभ अशुभ योगाची स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे आपल्या राशीला ढोबळमानाने कसं ग्रहमान असेल याची उत्सुकचा जातकांना आहे. राशीचक्रावर परिणाम होत असला तरी वैयक्तिक कुंडलीतील ग्रह काय सांगतात हे देखील महत्त्वाचं ठरतं. चला जाणून घेऊयात जुलै महिना तुमच्या राशीला कसा असेल ते.

मेष : या राशीच्या जातकांनी आर्थिक स्थिती चांगली राहील. या काळात उद्योगधंद्यात भरभराट दिसून येईल. घरात वातावरण चांगलं राहावं यासाठी तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. काही लोकांना आरोग्यविषयक तक्रारी भेडसावू शकतात. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. संपूर्ण महिन्यात तुमचा आत्मविश्वास दुणावलेला राहील.

वृषभ : कौटुंबिक कलहामुळे मन अस्थिर राहील. जोडीदारासोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतात. आर्थिक स्थिती खालावलेली असल्याने अडचणींचा डोंगर उभा राहील. कोणतंही काम हाती घेण्यापूर्वी दहावेळा विचार करा. शुक्राची स्थिती चांगली असल्याने समजात मानसन्मान मिळेल. पण वाद असं वागू नका.

मिथुन : महिन्याची सुरुवात एकदम अडचणीची जाईल. पैशांची जुळवाजुळव करताना चांगलीच दमछाक होईल. पण महिन्याच्या मध्यात हळूहळू रुळावर येण्यास सुरुवात होईल. नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. तसेच जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो.

कर्क : गेल्या काही दिवसांपासून नोकरीत बदल करणाऱ्या जातकांना चांगली ऑफर मिळू शकते. पण या महिन्यात खर्चावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. महिन्याच्या शेवटी आर्थिक कोंडी होऊ शकते. त्यामुळे पैसे वापरताना काळजी घ्या. आरोग्य विषयक तक्रारी डोकं वर काढू शकतात. तब्येतीची काळजी घ्या.

सिंह : या राशीच्या जातकांना हा महिना उत्साह आणि आत्मविश्वासाने भरलेला राहील. उद्योग धंद्यात अपेक्षित यश मिळेल. कुटुंबातील काही व्यक्तींसोबत वाद होऊ शकतो. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. विदेशवारी करणाच्या विचारात असाल तर या महिन्यातील ग्रहमान अनुकूल आहे.

कन्या : कौटुंबिक वादामुळे जीव नकोसा होईल. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी स्थिती होईल. वादामुळे कोणत्याच कामात मन रमणार नाही. वादाच्या मुलांच्या बौद्धिक क्षमतेवर परिणाम होईल. त्यामुळे वाद टाळता येईल असंच पाहा. आर्थिक स्थिती व्यवस्थित राहील. जमवलेले पैसे खर्च होणार नाही याची काळजी घ्या.

तूळ : या राशीच्या लोकांना संमिश्र परिणाम या महिन्यात मिळताना दिसेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला जाईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. छोट्या प्रवासाचे योग जुळून येतील. घरातील वातावरण चांगलं राहील. अचानकपणे धनलाभ होऊ शकतो.

वृश्चिक : घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींची या काळात काळजी घ्या. आरोग्यविषयक तक्रारी या काळात डोकं वर काढेल. मंगळ धनस्थानात असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. या महिन्यात केलेली गुंतवणूक फलदायी ठरेल. घर किंवा जमिन खरेदीसाठी उत्तम काळ आहे. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.

धनु : या महिन्यात गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होताना दिसतील. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला राहील. कला क्षेत्रात यश मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना काही त्रास सहन करावा लागू शकतो. बॉसकडून कामाचा अतिरिक्त ताण पडेल. वेळे अपुरा पडत असल्याने चिडचिज होईल. धनलाभ आणि पदोन्नती होण्याची शक्यता आहे.

मकर : कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. या महिन्यात अध्यात्माकडे ओढा जास्त राहील. तीर्थयात्रा या काळात घडू शकते. विदेशात शिकण्याची ओढ असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. व्यवसायात यश मिळेल. जोडीदाराची तुम्हाला उत्तम साथ या काळात मिळेल. त्यामुळे काही किचकट कामं झटपट पूर्ण कराल.

कुंभ : करिअरमध्ये काही उतारचढाव या काळात अनुभवायला मिळतील. नव्या योजनांवर लक्षपूर्वक काम करा. अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं. धनहानी होण्याची या काळात शक्यता आहे. या महिन्यात रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. काही गोष्टी आपल्या हातात नसतात हे लक्षात ठेवा. विचार करून गुंतवणूक करा. वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आरोग्य विषयक तक्रारी डोकं वर काढू शकतात.

मीन : आरोग्यविषयक तक्रारींचा डोंगर या कालावधीत समोर उभा राहील. मधुमेह असलेल्या जातकांनी विशेष काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यापाऱ्यांना हा महिना चांगला जाईल. अनपेक्षितपणे काही व्यवहार लाभ देऊन जातील. आई वडिलांकडून चांगली आर्थिक मदत मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. समाजात काही कारणास्त छबी खराब होऊ शकते.

Leave a Comment