उन्हाळ्यात सनबर्न, सनटॅनिंग सारख्या समस्य़ांचा धोका टळत नाही तर दुसरीकडे पावसाळ्यात गजकर्ण, खाज, खरूज सारख्या त्वचेच्या समस्यांचा धोका निर्माण होतो. अनेकदा पावसाळ्यामध्ये सतत ओले कपडे घातल्याने, तसचं पावसाचं पाणी आणि घामामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होत असतात.
गजकर्ण हे एक प्रकारचं इंफेक्शन असून ते संसर्गजन्य आहे. म्हणजेच ते एका व्यक्तीमुळे दुसऱ्याला देखील होवू शकतं. यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. गजकर्णामुळे त्वचेला वारंवार खाज येते तसंच खाजवल्याने त्वचेवर रॅशेस येतात.
रिंगवर्म म्हणजेच गजकर्णाची बुरशी ही साधारण बंद खोल्या, बेड किंवा पूलमध्ये आढळते. याशिवाय ती टॉवेल, कंगवा, केसांचे ब्रश आणि कपड्यांनाही चिकटते. यासाठी गजकर्णावर लगेचच उपाय करणं गरजेचं आहे. काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही यावर नियंत्रण मिळवू शकता.
हळद- हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म आढळतात. त्यामुळे गजकर्ण, खाज खरूजच्या समस्येवर हळद गुणकारी ठरते. यामुळे संसर्ग वाढत नाही. यासाठी तुम्हाला केवळ हळदीमध्ये थोडं पाणी टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट गजकर्ण तसचं खरूज झालेल्या ठिकाणी लावा. ही पेस्ट वाळल्यानंतर स्वच्छ धुवा. यामुळे इंफेक्शन कमी होण्यास मदत होईल.
कडूलिंब- कडूलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. त्वचेच्या विविध समस्यांवर कडूलिंब गुणकारी आहे. त्याचप्रमाणे खाज-खरूजमध्ये कडुलिंब रामबाण ठरतं. यासाठी कडुलिंबाची काही पानं वाटून पेस्ट तयार करा. ही पेस्ट खरूज असलेल्या भागावर लावा . काही वेळाने स्वच्छ धुवा. कडुलिंबातील अँटीफंगल गुणधर्मामुळे लवकर आराम मिळेल.
नारळाचं तेल- नारळाच्या तेलामध्ये मायक्रोबियल आणि अँटीफंगल गुणधर्म उपलब्ध असतात. त्वचेच्या अनेक समस्यांसोबतच गजकर्ण, खाजेच्या समस्येवरही नारळाच्या तेलाचा वापर लाभदायक ठरतो. यासाठी प्रभावित त्वचेचा भाग स्वच्छ धुवून कोरडा करा. त्यानंतर या भागावर थोडं नारळाचं तेल कोमट करून लावा. दिवसातून २-३ वेळा नारळाच्या तेलाचा वापर करा.
झेंडूची फूलं- झेंडूच्या फुलांचा वापर आजवर तुम्ही देवाला हार तयार करण्यासाठी किंवा दारातील तोरण बनवण्यासाठी केला असेल. मात्र त्वचेसाठी देखील झेंडूची फूल गुणकारी ठरतात. झेंडुच्या फुलांमध्ये विविध प्रकारची अँटीफंगल आणि अँटीएलर्जिक गुणधर्म आढळतात.त्यामुळेच गजकर्ण, खाज, खुजली सारख्या त्वचेच्या इंफेक्शनसाठी झेंडूच्या फुलांचा वापर प्रभावी ठरू शकतो.
टोमॅटो आणि लिंबू- त्वचेचा रंग उजळणे, टॅनिंग दूर करणे यासोबतच टोमॅटो आणि लिंबाच्या रसाचा गजकर्णाची समस्या कमी करण्यासाठी देखील वापर केला जाऊ शकतो. टोमॅटो आणि लिंबामध्ये असलेल्या विटामिन सी मुळे त्वचेच्या विविध समस्या कमी होण्यास मदत होते.
गजकर्णाची समस्या दूर कऱण्यासाठी तुम्ही टोमॅटोच्या ज्यूसचं सेवन करू शकता. तसचं लिंबाचा रस आणि चिचेच्या बियांची पावडर यांची पेस्ट तयार करून ही पेस्ट प्रभावित त्वचेवर लावल्यास फायदा होईल.
शंखपुष्पी- शंखपुष्पी ही एक जडीबुटी असून अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जाते. पंचकर्ममध्ये शंखपुष्पी वापरली जाते. शंखपुष्पीच्या तेलाने दाहाची समस्या कमी होते.
गजकर्ण तसचं खाज आणि खरूज दूर करण्यासाठी तुम्ही हे काही घरगुती उपाय करू शकता. यासोबतच या समस्या संगर्गजन्य असल्याने काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
डाएट आणि लाइफस्टाइलमध्ये बदल करणं गरजेचं आहे.जास्त तेलकट आणि तिखट पदार्थांचं सेवन टाळावं.
डाएटमध्ये विटामिन सी, इ तसचं फायबरयुक्त पदार्थांचं सेवन वाढवा. प्रायव्हेट पार्टची स्वच्छता राखण गरजेचं आहे. प्रायव्हेट पार्ट पूर्ण कोरडे करूनच अंतर्वस्त्र परिधान करा. दमट कपडे घालू नका. सैल आणि कॉटनचे किंवा सुती कपडे घाला. गजकर्णच्या समस्यामध्ये दिवसातून २ कपडे बदला. तसचं दोनदा आंघोळ करा.इतरांचा टॉवेल किंवा नॅपकिन वापरू नका