सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःकडे जास्त लक्ष देत नाही. दररोजचा कामाचा ताण, बदलती जीवनशैली अशा अनेक गोष्टींमुळे आपण आपल्या शरीराची नीट काळजी घेत नाही. मग फास्टफूड खाण्यावर भर, एकाच जागी बसून काम करणं या गोष्टींमुळेच आपल्या शरीराची जास्त हालचाल होत नाही, त्यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. मग बहुतेक लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी फिट राहण्यासाठी अनेक उपाय करताना दिसतात.
डाएट, वर्कआउट असे वेगवेगळे उपाय ते करत असतात. मात्र तुम्हाला माहितीये का की तुम्ही सकाळी उठून काही नियम फॉलो केले तर तुमचं वजन नियंत्रणात राहू शकतं.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी उठल्या उठल्या आपण सर्वात आधी एक ग्लास पाणी पिलं पाहिजे. पाणी हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते जे आपले मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करते. तसंच मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी पाण्यात लिंबाचा तुकडा किंवा सफरचंद सायडर व्हिनेगरचे काही थेंब टाका आणि ते प्या.
दररोज नियमीत व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केल्याने आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न करण्यास मदत होते. दररोज 20 ते 25 मिनिटे व्यायाम करावा. यामुळे आपले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि आपले शरीर फिट राहते.
तुम्हाला जर फिट राहायचे असेल तर दररोज सकाळी नाष्टा करावा. तुम्ही नाष्टा केल्यामुळे तुमच्या शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहते. तसंच यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही आणि तुम्ही बाहेरील खाणंही बंद करू शकता. तसंच सकाळच्या नाष्ट्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट या गोष्टींचा समावेश करा आणि पौष्टिक आहार घ्या.
फिट राहण्यासाठी दररोज सकाळी ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी प्या. कारण यामधील काही घटक मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी मदत करतात. तसंच ग्रीन टीमध्ये काही एंटीऑक्सीडंट असतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात.