चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी कच्चे दूध अत्यंत फायदेशीर!

आपली त्वचा नेहमीच चमकत रहावी असं प्रत्येकाला वाटतं.सकाळी उठल्यावर शरीर निरोगी आणि दिवसभराचे काम करण्यासाठी उत्साही राहण्याकरता तुम्ही अनेक गोष्टी करत असता. परंतु शरीर स्वास्थाकडे लक्ष देत असताना आपण अनेकदा आपल्या त्वचेची देखभाल करणं विसरतो.

तुमचीही इच्छा असेल की सकाळी उठल्याबरोबर तुमची त्वचा दुधासारखी पांढरी आणि फुललेली दिसावी, तर तुम्हाला इकडे तिकडे धावण्याची गरज नाही. तुम्ही फक्त दुधानेच त्वचेची काळजी घेऊ शकता. कारण, दूध हा असा पदार्थ आहे जे तुमच्या सौंदर्यात भर घालू शकते. यामध्ये जीवनसत्त्वे, बायोटिन, पोटॅशियम कॅल्शियम आणि प्रथिने आढळतात. हे गुणधर्म केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर डाग, मुरुम यासारख्या त्वचेशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊया रात्रीच्या स्किन केअर रूटीनमध्ये दुधाचा समावेश कसा करावा.

क्लिंजर – अनेकदा लोक त्वचा स्वच्छ करण्यासाठी बाहेरून क्लिंझर विकत घेतात.पण त्याऐवजी तुम्ही दूध वापरू शकता. हे तुमच्या त्वचेसाठी सर्वोत्कृष्ट ठरु शकते. हे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल, धूळ, घाण सहज काढून टाकण्यास मदत करते.

तुम्ही मेक-अप रिमूव्हर म्हणून दुधाचाही वापर करू शकता. तुम्ही दोन चमचे कच्चे दूध फ्रीजमध्ये ठेवा. ते थंड झाल्यावर कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहरा खोलवर स्वच्छ होईल आणि कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होणार नाहीत.

दुधात नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. त्यात व्हिटॅमिन ए आणि बायोटिन, लॅक्टिक अॅसिड आणि प्रथिने असतात ज्यामुळे त्वचेला पुरेसे पोषण मिळते. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर दूध किंवा मलई लावून झोपत असाल तर त्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते. मॉइश्चरायझर म्हणून रोज दूध किंवा मलई लावा आणि झोपा. सकाळी उठल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. त्वचेशी संबंधित समस्या दूर होतील.

त्वचेच्या ग्लोसाठीही टोनर आवश्यक आहे, अशावेळी तुम्ही मिल्क टोनर वापरू शकता. तुम्ही स्प्रे बाटलीत कच्चे दूध घालून चेहऱ्यावर स्प्रे करा. यामुळे तुमच्या चेहऱ्याला पुरेसे पोषण मिळेल.तुमची त्वचा आतून निरोगी होईल.

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर फेस मास्क लावा. यासाठी एक चमचा मुलतानी मातीमध्ये कच्चे दूध मिसळा आणि नंतर चेहऱ्यावर लावा आणि १५ ते २० मिनिटे कोरडे होऊ द्या. स्वच्छ पाण्याने स्वच्छ करा. यामुळे सुरकुत्या, वृद्धत्व या समस्यांपासून सुटका मिळेल. निस्तेज त्वचा चमकेल.

Leave a Comment