रंगाचा आणि आनंदाचा सण असलेल्या होळीला अवघे काही दिवस उरले आहे. होळी दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. रंगपंचमीच्या एक दिवस आधी होळी दहनाचा सण साजरा केला जातो. या दिवसासाठी हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये काही विशेष नियम सांगितले आहेत, जे पाळले पाहिजेत. त्यामुळे यावर्षी होळी दहन कधी आहे याबद्दल या लेखात सविस्तरपणे जाणून घेऊया. तसेच या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे देखील जाणून घ्या.
होळी दहन कधी आहे?
हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी सकाळी 10 वाजून 35 मिनिटांनी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 मार्च रोजी दुपारी 12 वाजून 24 मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे. त्यामुळे होळी दहन 13 मार्च रोजी केले जाईल. 13 मार्च रोजी रात्री 11वाजून 26 मिनिटांपासून ते 12 वाजून 30 मिनिटांपर्यंत होळी दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे. त्यामुळे होळी दहनासाठी एकूण 1 तास 4 मिनिटे उपलब्ध आहे. तर दुसऱ्या दिवशी 14 मार्च रोजी रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जाईल.
होळी दहनाच्या दिवशी काय करावे?
होळी दहनाच्या दिवशी सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे. ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर करा. या दिवशी व्रत किंवा उपवास देखील करता येते. तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तरेकडील दिशेला तुपाचा दिवा लावा. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की असे केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी, तीळ, 11 शेणाचे गोळे, तांदळाचे दाणे, साखर आणि गव्हाचे दाणे वापरा. पूजा केल्यानंतर, होळीच्या भोवती 7 वेळा प्रदक्षिणा मारा. त्यानंतर मग ते जाळून टाका. यादिवशी गरिबांना दान करा. कारण होळीच्या दिवशी दान करणे शुभ असते.
होळी दहनाच्या दिवशी काय करू नये?
होळी दहनाच्या दिवशी चुकूनही कोणालाही पैसे उधार देऊ नका. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जो कोणी या दिवशी कर्ज देतो, त्याच्या घरी येणारे आशीर्वाद थांबतात. होळी दहनाची पूजा करताना काळे किंवा पांढरे कपडे घालू नका. पूजेदरम्यान हे रंग परिधान करणे अशुभ मानले जाते. होळी दहनाच्या पूजेदरम्यान महिलांनी चुकूनही केस बांधू नयेत. मोकळ्या केसांनी होळीची पूजा करा. होळी दहनच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाताने किंवा पायाने स्पर्श करा. या दिवशी काळ्या जादूचा धोका जास्त असतो. नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्या घरात पहिल्या होळीला होळी दहनाचा अग्नी पाहू नये. हे अशुभ मानले जाते.