भारतीय संस्कृतीमध्ये दानाचं खूप महत्त्व आहे. गरजू व्यक्तीला दान केल्यास तुम्हाला पुण्य प्राप्त होतं, असं हिंदू धर्मामध्ये म्हटलं आहे.आपल्याकडे तुलनेनं जास्त असलेली एखादी वस्तू दुसऱ्याला दान दिली तर आपल्या घराला सुख शांती लाभते, समृद्धी येते, मात्र दानाचे देखील काही नियम आहेत, तुम्हाला माहिती आहे का की अशा काही वस्तू आहेत ज्या सूर्यास्तानंतर दान करू नयेत, असं केल्यास माता लक्ष्मीची अवकृपा होते, असं मानलं जातं. आज आपण अशा वस्तूंची माहिती घेणार आहोत. ज्या रात्रीच्या वेळी दान करू नयेत.
दूध – जर तुम्हाला दुधाचे दान करायचे असेल तर ते सूर्यास्तापूर्वी करा, सूर्यास्तानंतर दूध दान करणं अशुभ मानलं जातं. दूध हे पांढरं असतं, चंद्राचं कारक असतं, त्यामुळे तुम्ही जर दूध सूर्यास्तानंतर दान केल्यास माता लक्ष्मीची तुमच्यावर अवकृपा होते, असं मानलं जातं.
दही – दुधाप्रमाणेच रात्रीच्यावेळी दही देखील दान करू नये, दह्याचा संबंध हा शुक्राशी जोडला जातो. त्यामुळे असं मानलं जातं. की तुम्ही जर रात्रीच्यावेळी दही दान केल्यास तुमचं वैभव कमी होतं.
पैसे – पैसे देखील सूर्यास्तानंतर दान करू नये,असे केल्यास आर्थिक नुकसान होतं असं मानलं जातं. सायंकाळच्या वेळी घरात लक्ष्मी मातेचं आगमन होतं, त्यामुळे अशावेळी जर तुम्ही पैशांचं दान केलं तर ते अशुभ मानलं जातं. त्यामुळे कधीही पैशांचं दान हे दिवसा करावं असं धर्मशास्त्रात सांगितलं आहे.
लसून आणि कांदा – जर सूर्यास्तानंतर तुमच्याकडे कोणी लसून किंवा कांद्याची मागणी केली तर चुकूनही देऊ नका, रात्रीच्यावेळी लसून किंवा कांदा देणं अशुभ मानलं जातं. लसून आणि कांद्याचा उपयोग हा काळ्या जादूच्या प्रयोगामध्ये देखील केला जातो. त्यामुळे सूर्यास्तानंतर या वस्तू दान करू नये असं मानलं जातं.
हळद – हळद देखील रात्रीच्यावेळी दान करू नये, रात्रीच्यावेळी हळद दान करणं अशुभ मानलं जातं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)