माघ पौर्णिमा आणि महाशिवरात्रीला होणार नाही कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान? जाणून घ्या काय आहे कारण

13 जानेवारीपासून प्रयागराज मध्ये महा कुंभाला म्हणजेच श्रद्धेच्या महान उत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी पहिले शाही स्नान झाले, मौनी अमावस्येला दुसरे शाही स्नान आणि वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर तिसरे शाही स्नान करण्यात आले. यावेळी अनेक नागा साधू, संत, भाविकांनी श्रद्धेने स्नान केले. तिसऱ्या शाही स्नानानंतर सर्व नागा साधूंनी आपापल्या आखाडांसह परतायला सुरुवात केली आहे. परंतु अजून दोन स्नान बाकी आहेत. जे माघी अमावस्या आणि महाशिवरात्रीला केले जाणार आहे. परंतु या दोन स्नानांना शाही स्नान मानले जात नाही. हे स्नान धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले गेले आहे. मात्र या दोन्ही स्नानांना शाही स्नान का मानले जात नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

माघी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीला शाही स्नान का नाही?

 

महा कुंभमेळ्याचे आयोजन ग्रह आणि ज्योतिष्य गणनेनुसार केले जाते. मुख्यतः जेव्हा सूर्य मकर राशीत असतो आणि गुरु ऋषभ राशीत असतो तेव्हा स्नान करणे हे शाही स्नान मानले जाते. त्यानुसार मकर संक्रांत, मौनी अमावस्या आणि वसंत पंचमीच्या दिवशी हा शुभ योग तयार झाला होता. त्यामुळे या दिवशी शाही स्नान करण्यात आले.

 

माघ पौर्णिमेच्या दिवशी गुरु ऋषभ राशीत असेल पण सूर्य कुंभ राशीत येईल याशिवाय महाशिवरात्रीलाही सूर्य कुंभ राशीत असेल त्यामुळे या दिवशी केलेले स्नानही शाही स्नान मानले जाणार नाही. माघ पौर्णिमा आणि महाशिवरात्रीला स्नान करणे देखील खूप शुभ मानले जाते. या दोन्ही तिथींना पवित्र संगमास्नान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते.

 

महाकुंभातील महा स्नानाची तिथी

 

महा कुंभातील चौथे महा स्नान माघ पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच बुधवारी 12 फेब्रुवारी 2025 रोजी केले जाईल.

 

महा कुंभाचे शेवटचे महा स्नान महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर म्हणजे 26 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे.

 

शाही स्नानाचे महत्त्व

 

हिंदू धर्मात महा कुंभामध्ये शाही स्नानाला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार महा कुंभात स्नान केल्याने व्यक्तीचे शरीर शुद्ध होते आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळते तसेच मोक्ष प्राप्त होतो. याशिवाय वसंत पंचमीच्या दिवशी संगमाच्या तीरावर शाही स्नान केल्याने सरस्वतीचा आशीर्वाद मिळतो आणि व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो.

Leave a Comment