श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात शिवची आराधना केली जाते. या महिन्यात उपवासाला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात उपवास केल्याने शिवाची कृपा प्राप्त होते, अशी मान्यता आहे.
श्रावण महिन्यात सोमवारचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. श्रावण महिन्यात शिवभक्त दर सोमवारी उपवास करतात व शिवमूठ वाहतात पण तुम्हाला माहिती आहे का, यंदा श्रावण महिना केव्हापासून सुरू होतोय? श्रावण महिन्यात किती श्रावण सोमवार आहेत? आणि प्रत्येक सोमवारी कोणती शिवमूठ वाहावी? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
पंडित उदय मोरोणे सांगतात, “यंदा श्रावण महिना हा ५ ऑगस्ट २०२४ सुरू होतोय व २ सप्टेंबर रोजी श्रावण समाप्त होणार आहे. यंदाच्या श्रावण महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे श्रावण महिना हा सोमवार पासूनच होत आहे. या महिन्यात पाच श्रावण सोमवार आले आहेत. या महिन्यात शिवाचा महारुद्रभिषेक करावा. नियमित व्रत करावे. शिवाचा अभिषेक करत १०८ वेळा रोज बेल वाहावे.”
प्रत्येक सोमवारी कोणती शिवमूठ वाहावी? (shivamuth Pooja)
पंडित उदय मोरोणे पुढे सांगतात, “खाली सांगितल्याप्रमाणे दर सोमवारी शिवमुठ वाहावी.”पहिल्या सोमवारी शिवमूठ तांदूळ वाहावे.दुसऱ्या सोमवारी शिवमूठ तीळ वाहावे. तिसऱ्या सोमवारी शिवमूठ मूग वाहावे. चौथ्या सोमवारी शिवमूठ जव वाहावे. पाचव्या सोमवारी शिवमूठ हरभरा वाहावे.” लग्नानंतर श्रावण महिन्यात पहिले पाच वर्षे मंगळागौरीचे पूजन करावे. श्रावण महिन्यात श्री शिवलिलामृत अकरावा अध्याय रोज वाचावा. जर शक्य नसेल कर तुम्ही दर सोमवारी सुद्धा हा अध्याय वाचू शकता.”