वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये होळी पौर्णिमेचे महत्त्व मोठे आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन मासातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. ग्रेगोरियन कॅलेंडर व हिंदू दिनदर्शिका यामध्ये तिथीनुसार दिवस मागे पुढे होऊ शकतो ज्यामुळे अनेकदा एखादा सण नेमका कोणत्या तारखेला साजरा करायचा याबाबत संभ्रम असतो. यंदाची होळी नेमकी २४ मार्चला आहे की २५ मार्चला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आज आपण त्यावरचे सोपे उत्तर पाहणार आहोत. शिवाय यंदा होलिका दहनाचा शुभ मुहूर्त काय असेल व होलिका दहन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे सुद्धा जाणून घेऊया.
पौर्णिमा तिथी समाप्ती- २५ मार्च २०२४ रोजी दुपारी १२ वाजून २९ मिनिटे
पौर्णिमा तिथीचा उदय व मोठा अवधी हा २४ मार्चला असल्याने यंदा होलिका दहन ही २४ मार्चला केले जाईल तर रंगपंचमी किंवा धुळवड ही दुसऱ्या दिवशी २५ मार्चला साजरी होईल.
होलिका दहनाचा शुभ मुहूर्त: २४ मार्च २०२४ च्या रात्री १० वाजून २७ मिनिटांपासून ते १२ वाजण्याआधीपर्यंतचा कालावधी होलिका दहनासाठी शुभ आहे.
होलिका दहन करताना शास्त्रानुसार ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
असं म्हणतात की होलिका दहन करताना जेव्हा त्यात शेणाच्या गोवऱ्या वापरल्या जातात तेव्हा त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते. त्यामुळे शक्य असल्यास आपणही त्याचा वापर करू शकता. तसेच शास्त्रानुसार कच्च्या जमिनीवर किंवा विटांचा गोल तयार करून त्यामध्ये होलिका दहन करणे योग्य आहे. थेट सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर होलिका दहन करणे टाळावे. होळीला प्रदक्षिणा घालताना गव्हाची कर्णफुले आणि हरभरा इत्यादी अग्नीला अर्पण करण्याची सुद्धा पद्धत आहे काही ठिकाणी अग्नी देवतेला नारळ सुद्धा दिला जातो.
होलिका दहनाची गोष्ट
धर्मग्रंथानुसार, भक्त प्रल्हादाची भगवान विष्णू यांच्यावर निस्सीम श्रद्धा होती. मात्र त्याचे वडील हिरण्यकश्यपला हे आवडत नसेल. काही केल्या पुत्राचा भगवान विष्णूंवरील विश्वास कमी न झाल्याने एके दिवशी रागाने हिरण्यकश्यपने बहिण होलिकाला आज्ञा केली की, तिने भक्त प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीत बसावे, ज्यात प्रल्हाद अग्नीत जळून राख होईल. असुराची बहीण होलिका हिला वरदान होते की, ती अग्नीत जळू शकत नाही, पण जेव्हा होलिका प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते तेव्हा प्रल्हाद वाचतो आणि होलिकाचे राख होते. याच कथेवरून वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी होळी साजरी केली जाते.