हिंदू धर्मात भगवान शंकराला दया आणि करुणेची देवता मानलं जातं. महादेव खूप भोळ्या स्वभावाचे आहेत. त्यामुळे त्यांना भोलेनाथ असंही म्हटलं जातं. जो भक्त मनापासून आणि श्रद्धेने शिवआराधना करतो, त्याचं नक्कीच कल्याण होते.
पंडित इंद्रमणी घनश्याल यांनी सांगितलं, की महादेवाची मनापासून पूजा केली तर ते प्रसन्न होतात; पण महादेवाला प्रिय गोष्टी अर्पण केल्या तर त्यांची विशेष कृपादृष्टी लाभू शकते. भगवान शंकराला बेलाचं पान विशेष प्रिय आहे. त्यामुळे बेलपत्र अर्थात बेलाचं पान अर्पण केल्यास भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. महाशिवरात्रीच्या निमित्तानं बेलाच्या पानाचं महत्त्व आणि भगवान शंकराला बेल अर्पण करण्याचे नियम जाणून घेऊ या.
बेलाच्या पानांचं महत्त्व
शिवपुराणानुसार, समुद्रमंथनातून बाहेर पडलेल्या विषामुळे पृथ्वीवर संकटाचे ढग दाटले. तेव्हा भगवान शंकराने सृष्टीच्या रक्षणासाठी ते विष प्राशन केलं. त्यामुळे महादेवाच्या शरीराचं तापमान वाढलं आणि संपूर्ण सृष्टी आगीसारखी जळू लागली. त्यामुळे पृथ्वीवरचे जीव संकटात सापडले. सृष्टीच्या हितासाठी विषाचा परिणाम नष्ट करण्याकरिता देवतांनी महादेवाला बेलाचं पान अर्पण केलं. बेलाचं पान खाल्ल्यावर विषाची तीव्रता कमी झाली आणि तेव्हापासून महादेवाला बेलाचं पान वाहण्याची प्रथा सुरू झाली.
भगवान शंकराला बेलाचं पान कसं अर्पण करावं?
धार्मिक ग्रंथांमध्ये सर्व देवतांच्या पूजा-विधीचे वेगवेगळे नियम सांगितले गेले आहेत. शास्त्रानुसार भगवान शंकराला बेलाचं पान अर्पण करण्याचे काही नियम सांगितले गेले आहेत. त्यानुसार, भगवान शंकराला बेलाचं पान नेहमी गुळगुळीत पृष्ठभागाकडून अर्पण करावं. तुटलेल्या पानाचा बेल अर्पण करू नये. तीनपेक्षा कमी पानं असलेलं बेलपत्र शंकराला वाहू नये. केवळ 3,5,7 अशा विषम संख्येत पानं असलेला बेल अर्पण करावा. तीन पानं असलेला बेल हा शंकराच्या त्रिशूळाचं रूप मानला जातो.
‘या’ गोष्टींची घ्यावी काळजी
नेहमी बेलाचं पान हाताचं मधलं बोट, अनामिका आणि अंगठ्यात पकडून शंकराला वाहावं. बेलाचं पान कधीच अशुद्ध होत नाही. त्यामुळे एकदा अर्पण केलेलं पान पाण्यानं स्वच्छ करून ते पुन्हा अर्पण करता येतं. बेलाचं पान वाहिल्यानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करावा. या नियमानुसार बेलाचं अर्पण केल्यास भगवान शंकराची कृपादृष्टी लाभते आणि ते भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.