राहू- केतू हे मंदगतीने (वक्रगतीने) मार्गक्रमण करणारे ग्रह आपल्या प्रत्येकाच्या जीवनावर चांगले वाईट परिणाम करीत असतात. दिनांक २८ ऑक्टोबर २०२३ रोजी राहू मीन राशीत प्रवेश करणार आहे तर केतू कन्या राशीत. एकूण हे दोन्ही ग्रह आपला चांगला वाईट कटाक्ष बारा राशीवर टाकणार आहेत. यानुसार आपण भाग एक व दोन राहूच्या गोचराचा केंद्रातील प्रमुख नेते तसेच महाराष्ट्रातील राजकारणी मंडळींवर कसा प्रभाव पडेल हे पाहिले आहे. आता आजच्या लेखात आपण राहू बदलाचा सामान्य माणसावर कसा प्रभाव पडणार आहे हे पाहूया..
राहूबदल सामान्य माणसासाठी काय घेऊन येणार?
मेष रास (Aries Rashi Bhavishya)
मेष राशीला राहुचे भ्रमण बारावे येत आहे. राहू मीन राशीत म्हणजे मेष राशीच्या व्ययात आधीपासून असलेल्या नेपच्यूनच्या सानिध्यात येईल. त्यामुळे संसारात येणाऱ्या आर्थिक अडचणी वाढल्या तरी नेपच्यून मधील संयम खूपसा मदतीचा ठरेल. फारसे भावनिक न जगता, जे जे होईल ते ते पहावे. अशा उदात्त विचारांची उजळणी मनांत ठाई ठाई येणाऱ्या विपरित प्रसंगात अनुभवास येईल. काही अडीअडचणीचा बोध होईल. तेव्हा मनाचा खंबीरपणा खूपसा मदतीचा ठरेल. संसार सुखात नाते संबंध जपताना होणारी कसरत त्रयस्थपणे पाहून विचार करून त्यावर तडजोडीचा मार्ग एक हुकूमी इलाज ठरेल. आरोप – प्रत्यारोप वादविवाद यात आपला वेळ घालवू नका. बढाई मारणे, कामचुकारपणा करणे. एखाद्याच्या मानसिक स्थितीचा, परिस्थितीचा फायदा घेणे, कर्ज देऊन वेगळे मोबदले मागणे खूप चुकीचे ठरेल. मात्र या काळात झालेला आर्थिक लाभ उधळून टाकणे, अति दानधर्म करणे खूप त्रासदायक ठरू शकेल.
मेष राशीला जेव्हा राहू बारावा असतो त्याच्या नेमक्या सहाव्या स्थानात केतू विराजमान झालेला असतो. केतू जेव्हा मेष राशीला येतो तेव्हा सामाजिक राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढते. नावलौकीक होतो नी अधिकारप्राप्त होतो हा अठरा महिन्याचा कालावधी खूप उत्कर्ष घडवून आणतो. जुने आजार, मानसिक स्थिती उत्तम राहते. उद्योगधंद्यात, नोकरीत उत्तम प्रगती होते. त्यात नवीन संधी चालून येतात. अशावेळी मनाचा गोंधळ थांबवून ठाम निर्णय घ्यावेत. तसेच प्रेम प्रकरणात, वैवाहिक सौख्यात संबंध चांगले राहतात. एक निकोप सलोखा तयार होतो. मात्र भावनेच्या भरात आर्थिक नुकसान होणार नाही याची खूप काळजी घ्या. आयुष्यात आलेला हा एक उत्तम काळआर्थिक मानसिक नी अध्यात्मिक प्रगती साधण्याची ही संधी वारंवार येत नसते.
वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)
वृषभ ही शुक्राची राशी त्या राशीच्या लाभस्थानात राहूचे वास्तव्य खूपच शुभदायक ठरेल. सामाजिक क्षेत्रात, राजकारणात हा राहू यशदायक ठरेल. तर नवीन परिचय, नवीन ओळखीतून उद्योगधंद्यात नोकरीत नव्या योजना आखल्या जातील. एकूण नातेवाईक मित्रमंडळींचा सहवास आनंदी उत्साही ठरेल. मात्र या काळात अति भावनिक, अति वेंधळेपणा टाळावा. कारण आपल्या उदार स्वभावाच फायदा कुणालाही घेऊ देऊ नका. शुक्राची ही रास नी अकराव्या स्थानातील मीनेचा राहू नेपच्यून अध्यात्मिक अभ्यासाला उत्तम ठरतो. त्यातून सुचणारे आचारविचार सामाजिक जगण्याला खूप मार्गदर्शक ठरतील. या राहू सहवासाच्या अठरा महिन्याच्या काळात मिळणारे आत्मिक समाधान पैशाहून खूप मोलाचे ठरेल.
लाभस्थानात राहू तर समोर पंचमस्थानात कन्या राशीतील केतू हा समाजकार्यात, राजकारणात खूप मदतीचा ठरतो. मात्र आर्थिक बाबतीत खूप हुशारीने वागावे. फसवणूक होऊ शकते. व गाफील राहील्याने नको ते आरोप होऊ शकतात. तेंव्हा काळजी घेणे हिताचे ठरेल. पंचमातील केतूमुळे कौटुंबिक गैरसमज प्रेमप्रकरणे यातून वाद निर्माण होऊ शकतील. सरकारी दरबारी कामात दिलेली कामे गुप्तता पाळून सावधपूर्वक करावीत. कुणावरही अतिविश्वास भरोसा करू नये. त्यातून नको तो मनस्ताप होऊ शकतो. तसेच पोटाची विशेष काळजी घ्यावी. विशेषत: विद्यार्थ्यांनी अभ्यासात विशेष लक्ष द्यावे. वेळेचे भान ठेवून आळस झटकून आपली महत्त्वाची कामे पूर्ण करण्याकडे लक्ष असावे.
मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)
मिथुन ही बुधाची स्वगृहीची रास १८ नोव्हेंबर २०२३ ला राहू मिथुन राशीच्या दशमात प्रवेश करणार आहे. सोबत नेपच्यून एकूण दशम स्थानातील या दोन ग्रहांच्या वास्तव्यामुळे या १८ महिन्याच्या काळात उद्योगधंद्यात नोकरीत कमालीचे उत्तम बदल दिसून येतील. विशेषत: मानसोपचारतज्ञ व्यवसायात दशमातील राहू नेपच्यूनच्या सहवासामुळे उत्तम नावलोकीक प्राप्त होईल. तसेच गूढ विद्या, संगीतकला, लेखन, चित्रकला या विषयातील लोकांनाही उत्तम नावलौकीक प्राप्त होईल. मात्र घरातील वडीलधारी मंडळीच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. तसेच राजकारण, सार्वजनिक क्षेत्रात जपून पावले टाकावीत. गुप्त शत्रूकडून त्रास जाणवेल. तसेच आराेग्याच्या बारीक सारीक तक्रारी जाणवतील योग्य ते उपाय जरुर करावेत.
मिथून राशीला केतू यावेळी कन्या राशीत चतुर्थ स्थानात येणार आहे. त्यामुळे कौटुंबिक नाते संबंधात गैरसमज किरकोळ वाद संभवतील इतकेच नव्हे तर मित्रांकडूनही विरोध होणे अबोला गैरसमज आदी घटना घडू शकतील. पण मिथुन राशीच्या उत्तम बौद्धीक सहज वागण्यातून यावर या राशीच्या व्यक्ती सहज मात करू शकतील. उत्तम बोलणे, समजून घेणे यातून खूपशा गोष्टीत चांगले बदल दिसून येतील. केतूमुळे वाहन सुखाची संधी लाभू शकते. स्थावर इस्टेटीतही खूप चांगले बदल होतील. पण केतू या ऐहीक सुखात विशेषत: संपत्ती, मालमत्ता, जमीन या विषयात जास्त रमत नाही. कारण मूळच्या संन्यस्त वृत्तीमुळे यांची मानसिकता हे सगळे मिथ्य नजरेने पाहत असते.
कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)
कर्क राशीच्या भाग्यस्थानात राहू प्रवेश करीत आहे. सध्या राहू सोबत नेपच्यूनची उपस्थिती असणार आहे. एकूण हा योग नवमस्थानात खूपच शुभदायक ठरणार आहे. या अठरा महिन्यात पापग्रहही शुभ फळे देतात. असा आगळा वेगळा अनुभव प्रत्ययास येईल. मात्र सकारात्मक मानसिकतेने प्रत्येक प्रसंगाला सामोरे जा. उद्योगधंद्यात, नोकरीत आपण आखलेल्या योजनांची पूर्तता होण्याचे प्रसंग अनुभवू शकाल. राजकारणात, सामाजिक कार्यात आपल्या मुत्सद्दीपणाचे कौतुक होईल. दूरचे प्रवास होतील. तिर्थक्षेत्री जाण्याचे योग येतील. राहू नेपच्यूनच्या सहकार्यातून अध्यात्मिक ओढ वाढेल. चिंतन श्रवण जपजाप्य यात मन अधिक रमेल. जागा प्रॉपर्टी संबंधातील कामे मार्गी लागतील. जुनी येणी येतील. एकूण या काळात खूपशा गोष्टी छान मार्गी लागीतल.
राहु प्रमाणेच केतू ही पराक्रम स्थानात तृप्तियात खूप चांगली शुभफळे देतो. मानसिक, शारिरीक बळ देण्याचेक ाम केतू करीत असतो नी साहस पराक्रम नी अतिश्रम यातून यश प्राप्त होत असते. राजकारणात उद्योगधंद्यात पराक्रमातील राहू खूप वेगळेपणाने चातुर्याने यश मिळवण्याची किमयया देतो. मात्र कौटुंबिक आणि उद्योगधंद्यात गैरसमज मतभेद टाळावेत अशामधून वेगळे होऊन स्वतंत्र धंदा करण्याचे धाडस करू नये. सामोपचाराने वाद मिटवावेत. तसेच तिर्थयात्रा दुरचे प्रवास घडतील. गूढविद्येत उत्तम प्रगती साधता येईल. एकूण प्रसिद्धी योगात केतूची उत्तम मदत लाभेल.
सिंह रास (Leo Rashi Bhavishya)
कर्क राशीच्या अष्टमस्थानात राहुचा प्रवेश होत आहे. अपयश, उद्योगधंद्यात नुकसान तर नोकरीत वरिष्ठांशी गैरसमज पुढील आयुष्यात चांगल्या घटना घडण्याआधी अशा घटनांकडे एक आयुष्यातील वेगळा अनुभव म्हणून पाहिले तर बऱ्याच घटनांची तीव्रता कमी होईल. अशावेळी काम, क्रोध, लोभ, मत्सर अशा गोष्टींकडे फारसे आकर्षित होणे हा एक चांगला उपाय ठरू शकेल. हा अष्टमातील राहू खोटी स्वप्ने, खोटे प्रेम हे प्रसंग आपल्या जीवनांत निर्माण करतील पण कटाक्षाने काळजी घेऊन त्यापासून दोन हात दूर राहणे सोयीचे ठरेल. मानसिक स्तर उत्तम ठेवून निर्णय घेतले तर हा राहू फारसा त्रासदायक ठरणार नाही. मात्र या राहू वर जन्मकालीन गुरुची शुभदृष्टी असेल तर राहू फारसा तापदायक ठरणार नाही.
सिंह राशीत राहू अष्टमात असताना केतू राहूच्या समोरच्या स्थानात म्हणजे सप्तमस्थानात असतो. अशा लोकांनी आपल्या बोलण्यावरती संयम ठेवावा. आवेगाने, रागाने बोलून नवे शत्रुत्व निर्माण करू नयेत. कुटुंबात अचानकनवीन जबाबदाऱ्या निर्माण होतील. राजकारणात सामाजिक जीवनांत आर्थिक व्यवहार चोख ठेवावेत. त्यातून मानहानी, चुकीचे आरोप, गैरसमज होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच प्रवासात महत्त्वाच्या वस्तूंची जपणूकक रा. चोरी वा हरवणार नाही याची काळजी घ्या तसेच आरोग्य सांभाळा.
कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)
कन्या राशीला सातव्या स्थानातील राहू सट्टा लॉटरीत या देतो. पण तो मिळालेला पैसा कसा निघून जातो ते कळत नाही. हा राहू नको ते कौटुंबिक वाद निर्माण करतो. यासाठी काही पथ्ये पाळणे हिताचे ठरेल. त्यात मुख्य म्हणजे घरातील वातावरा आनंदी ठेवावे. आपल्या लहानशा चुकातून मोठे काही घडणार नाही. याची काळजी घ्यावी. मित्रमंडळीत जास्त वेळ राहणे घरात वेळ न देणे या चुका त्रासदायक ठरतील. आर्थ-क उधळपट्टी करू नये. राजकारणात सामाजिक क्षेत्रात वावरताना नको ती आश्वासने वचने देऊ नयेत. अचानक विरोध उभा राहू शकतो. भावनिक स्तरावर गुंतून चांगले सांसारिक जीवन अधिक गुंतागुंतीचे करू नये. कोर्टकचेरीतील दावे बाहेर मिटवून त्रास व वेळेचा अपव्यय टाळावा.
कन्या राशीत केतूचे वास्तव्य खूपशा रेंगाळलेल्या समस्या हळूहळू मार्गी लागतील. आपल्या मेहनती वृत्तीतून, हुशारीतून आपल्या उद्योगधंद्यात नोकरीत उत्तम गती प्राप्त होर्लल. आर्थिक बाबतीत आपली घडी हळूहळू बसू लागेल. कौटुंबिक सुखात निर्माण झालेले गैरसमज दूर होतील. शिक्षण वा कामानिमित्त परदेशगमन योग येतील. या संधीचा जरुर फायदा करून घ््यावा. एकंदरीत केतूचे हे अठरा महिन्याचे कन्या राशीतील भ्रमण सौम्य पण शुभदायक ठरेल.
तूळ रास (Libra Rashi Bhavishya)
गेल्या अठरा महिन्याच्या काळात खुपसे वाईट अनभव आपल्याला आले असतील. शारिरीक आजार, मानसिक स्थिती वर खाली होणे या सारख्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागले होते. आता १८ महिन्यानंतर २८ नोव्हेंबर २०२३ पासून राहू आपल्या राशीच्या सहाव्या स्थानत प्रवेश करीत आहे. त्यामुळे हा काळ आपल्या राशीला अतिशय शुभदायक जाईल. सुख समाधान शांती लाभेल. आरोग्यात सुधारणा होईल तर उद्योगधंद्यात नोकरीत कामाचा आवाका सांभाळण्याची उर्जा प्राप्त होईल. विशेष म्हणजे मनाचा उत्साह वाढेल. तसेच कयम होणारा विरोध अडचणी हळूहळू कमी होत जातील. एकूण हा पुढील अठरा महिन्याचा काळ प्रगतीचा ठरेल.
तूळ राशीला कन्या राशीत केतूचे आगमन होत आहे. त्यामुळे हा नेपच्यून सोबत असणारा केतू सरकारी कामात तसेच आरोग्य सेवेच्या कामात खूप मदतीचा ठरेल. मात्र समाजसेवेत राजकारणात नको त्या संकटांना सामोरे जावे लागते. तेव्हा याबाबतीत खूप काळजीपूर्वक ागून जबाबदाऱ्या घ्याव्यात कारण राहू नेपच्यूनमुळे समाजसेवा, लोकोपयोगी कामे करण्याची हौस निर्माण होईल. पण तूर्त त्या पासून दूर राहणे हिताचे ठरेल. तसेच जमीन जागा प्रॉपर्टी यातून मिळवलेला पैसा कुठेही उसनवार देऊ नये. पैसे परत मिळण्यास विलंब लागेल. आपल्या भावनांशी खेळणाऱ्या माणसाला त्वरीत बाजूला करावे वा त्याच्यापासून दूर राहणे हिताचे ठरेल. आत्मसन्मान जपावा. त्यातूनच पुढील आयुष्य सुखाचे ठरेल.
वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)
वृश्चिक राशीला पंचमात राहू जरी काळ कठीण असला तरी काही बंधने स्वत:वर घातली तर खूपशा त्रासापासून स्वत:ला दूर ठेवू शकाल शक्य तितके आरोग्य सांभाळणे जरुरीचे ठरेल. उद्योगदांद्यात नोकरीत मिळणारा पैसा जपून ठेवावा. सट्टा लॉटरी नी व्यसनांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. तसेच प्रकृतीबाबत नेहमी संशयीत मन राहील. विशेषत: पोटाचे आजाराबाबत उगाच मन भयभीत होईल. प्रेमप्रकरणात दोन पावले दूर असणे खूपच योग्य ठरेल. फसवणूक विश्वासघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र अध्यात्मासाठी हा राहू व सोबत असलेला नेपच्यून खूपच मार्गदर्शक ठरेल.
राहु जेव्हा पंचमात असतो तेव्हा केतू एकादशात असतो. मात्र यावेळी कन्या राशीतील हा लाभस्थानातील केतू खूपच लाभदायक ठरेल. राहूच्या सगळ्या उणीवा हा केतू संयम बाळगून आपला पराक्रम सिद्ध करील हा अठरा महिन्याचा काळ राहूमुळे होणारे नुकसान भरून काढील. अनपेक्षितरित्या धनलाभाचे प्रसंग निर्माण होतील. उद्योगधंद्यात नोकरीत नवीन नवीन संधी प्राप्त होतील. राजकारण, सामाजिक कार्यात आपले वर्चस्व कायम राखू शकाल. दुरच्या प्रवासाचे योग घडून येतील. त्यातील ओळखी परिचयातून लाभ संभवतील.
धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)
धनु राशीला राहु चौथा कुटुंबस्थानात असणार आहे. त्यामुळे खूपशा मनाला न पटणाऱ्या गोष्टी हातून घडतील त्यातून तात्पुरता होणारा पश्चाताप विरळ होत जाईल. नी पुन्हा पुन्हा ते हातून घडेल अशा वेळी स्वत:वर काही बंधने घालून ती कटाक्षाने पाळून त्या त्या प्रसंगापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणे हाच एकमेव मार्ग ठरेल. भावूकता अतिविश्वास, प्रेमात सर्वस्व अर्पण करण्याची इच्छाा होणे मोठेपणा दिखाऊपणासाठी कर्ज काढून छान शौकी करणे घरातील लोकांचा होणारा विरोध त्यांची पर्वा न करता त्यांच्याकडे शत्रुत्वाच्या तुच्छ नजरेने बघणे ही सर्व लक्षणे चतुर्थातील राहू करण्यास भाग पाडली पण संयम मितभाषी वागणे, गैरसमज न होऊ देणे अशा वागण्यातून आपण या राहू नी निर्माण केलेल्या अवस्थेतून सहज बाहेर पडू शकाल.
मात्र अशावेळी दशमात प्रवेश करणारा कन्या राशीतील केतू या काळात तुम्हाला मोठा मानसिक आधार ठरेल. आपल्या उत्तम बुद्धीमत्तेचा उपयोग आपण आपल्या उद्योगधंद्यासाठी चांगला करू शकाल. या गोष्टी करत असताना आपल्याला उद्योगधंद्यात नोकरीत नवीन माणसाचा सहवास मैत्री खूप कामास येईल नी त्यांच्या मार्गदर्शनातून आपण आपली उत्तम प्रगती साधू शकाल. तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील खूपशा नवीन गोष्टी लक्षात येतील त्या आपल्या मानसिक उत्कर्षासाठी फायद्याच्या ठरतील. अशावेळी या अठरा महिन्याच्या काळात घरातील वृद्ध माणसाच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. मात्र या काळात केतू आपल्याला खूप मोठा आधार देईल हे निश्चित.
मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)
मकर राशीला राहू २८ नोव्हेंबरला पराक्रम स्थानात म्हणजे तिसऱ्या स्थानात प्रवेश करील. हा अठरा महिन्याचा काळ मकर राशीला खूपच लाभदायक ठरेल. उद्योगधंद्यात नोकरीत हा राहू आपले वर्चस्व वाढवण्यास मदत करील. सामाजिक राजकीय कामात कलावंत, खेळाडू थोडक्यात आपण ज्या क्षेत्रात काम करीत आहात त्या क्षेत्रात राहू आपले नाव, किर्ती, प्रतिष्ठा देण्यास खूप मदतीचा ठरेल. प्रेमसंबंध मित्रत्व यात निरपेक्षता वाढून संबंध अधिकाअधिक सुदृढ होतील. तसेच दूरचे प्रवासाचे योग जुळून येतील. जवळजवळ विरोध पूर्णपणे समाप्त होईल नी मैत्रीत वाढ होईल. जुने वैर, गैरसमज दूर होतील. आर्थिक बाबतीत जुने व्यवहार, जुनी येणी परत मिळतील. स्थावर इस्टेटीचे व्यवहारात फायदा होईल. एकूण राहूचे पराक्रम स्थानातील वास्तव्य सुख समृद्धी आणि आनंद देईल.
जेव्हा राहू पराक्रम स्थानात असतो तेव्हा केतूही भाग्यस्थानात प्रवेश करतो. भाग्यस्थान म्हणजे नवम स्थान या स्थानात केतू काहीसा तृतीयातील राहूच्या अपेक्षा भंग करीत असतो. खूपशा गैरगोष्टी करण्यासाठी केतू संधी शोधत असतो. बोलण्यात खूपसा दांभिकपणा, ढोंगीपणा दिसून येतो हा केतू कन्या राशीत असल्यामुळे नको तिथे बुद्धी वापरून संकटे निर्माण करण्यात हा केतू पुढे असतो. राजकारणात, सामाजिक कार्यात राहूने दिलेलं नावलैकिक केतूमुळे कलंकीत होण्याची पाळी येते. यासाठी सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून वर्तन करावे. सत्याची कास शेवटपर्यंत सोडू नये. या राहू केतूच्या चढाओढीत राहू नक्कीच यशस्वी ठरेल.
कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)
कुंभ राशीला राहू धनस्थानात प्रवेश करत आहे आणि तब्बल तो अठरा महिने द्वितीय स्थानात राहणार आहे. गरजा माणसाला गुलाम करतात अशीच कांहीशी स्थिती यावेळी कुंभ राशीची होणार आहे. आधीच डोक्यावर शनिच्या साडेसातीचे ओझे त्यात राहूचे आगमन काहीसा चिंतेचा विषय होईल. आर्थिक चणचण भासेल. जुनी येणी, येणारे पैसे अडकून राहतील माणसाची किंमत पैशात होते याची एक नवीन जाणीव मनाला होईल. कुटुंबातील दोष पर भाषा मनाला त्रास देईल. त्यातून इच्छा नसतानाही आपल्या वाणीतून निघणाऱ्या कठोर शब्दातून माणसे दुखावतील भावना आणि मन यातील तफावत जाणवेल. फक्त आपल्याच मनाला दोष देण्यापलीकडे हातात काही उरणार नाही. पण पराक्रमातील एकमेव गुरुशी होणारा त्रिएकादश योग पूर्णपणे पाठीशी उभा राहील.
मित्र – भावंडे एक वेगळा आधार म्हणून पाठीशी उभे राहतील नी मनाला खूपशी मोठी उसंत लाभेल नी त्या समाधानातून गुंफलेली नाती किती मोलाची असतात. त्याचा अनुभव येईल. त्यात भरीस भर म्हणून अष्टमातील केतूचा सहवास आरोग्यात बिघाड झाल्याचे भास निर्माण करील. त्या येणाऱ्या योगाचा जरुर फायदा करून घ्या. उदारपणा, दिलदार वृत्ती काहीशी बाजूला ठेवून येणाऱ्या आर्थिक लाभाचे मन:पूर्वक स्वागत करा.
मीन रास (Pisces Rashi Bhavishya)
मीन राशीत २८ नोव्हेंबर २०२३ ला येणारा राहू नेपच्यून या सात्विक ग्रहाच्या संगतीत राहणार आहे. त्यामुळे मीन राशीतील चंद्रासोबत याचे अस्तित्व अधिक उजळून निघणार आहे. इतकेच नव्हे तर खऱ्या अर्थाने मीन राशीतील गुरुची बुद्धीमत्ता विद्वत्ता दिसून येईल. या काळात आपल्या ज्ञानाचा खरा उपयोग जरी यांनी उद्योगधंद्यात, नोकरीत केला तर तो खूप महत्त्वाचा ठरेल. मात्र अति भावनावश होणे मनांत प्रेमाचा काहूर माजणे हे असे भावनिक प्रकार टाळावेत. निश्चय , गांभीर्य, स्वाभिमान बाळगून यांनी आपण हाती घेतलेल्या कामात लक्ष घालावे. संकटे कटूप्रसंग येणार जाणार पण हतबलतेत हरवून जाऊ नका. कारण ही जलतत्त्वाची रास कधी कधी स्वत:शीच साशंक होऊन स्वत:ला निषप्रभ करते.
एकूण हा अठरा महिन्याचा प्रवास सुखदु:खाच्या अनुभवातून पार पडेल पण तो पुढील आयुष्यासाठी जगण्याची एक वेगळी दिशा दाखवून देईल ते बरे वाईट अनुभव तुम्हाला मार्गदर्शक ठरतील. तर सप्तमातील केतूचा प्रभाव खऱ्या संसारात शांतपणे जगण्याचा धडा गिरवून देईल. अशा वेळी कटू बोलणे टोकाची भूमिका घेणे टाळा. समोरच्या व्यक्तीला क्षमा करून पुढची पावले उचला. मानहानी आरोप होणार नाहीत यांची काळजी घ्या. त्यातून निर्माण होणाऱ्या सकारात्मक विचारांना एक निश्चित दिशा लाभेल.