माघी गणेश जन्माची कथा मुद्गल पुराणात वाचायला मिळते आणि याच ठिकाणी अंगारकी चतुर्थीचेही महत्त्व दिले आहे. यंदा १३ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जन्म अंगारक योगावर अर्थात मंगळवारी आल्यामुळे या उत्सवाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.त्यानिमित्ताने या दिवसाची महती जाणून घेऊया.
गणेश पुराण किंवा मुदगल पुराणात अंगारकी चतुर्थीबद्दल कथा सांगितली जाते, ती अशी- अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेशमंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला, की ‘माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल!
अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. जर खुद्द गणरायाने मंगळावर कृपादृष्टी केली, तर तुम्हीआम्ही त्याच्याकडे वक्रदृष्टीने पाहण्याची काहीच गरज नाही! मंगळाची धास्ती न बाळगता आपलेही जीवन मंगलमय व्हावे अशी प्रार्थना या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने करता येईल.
अंगारकी चतुर्थीला अनेक जण अन्न-पाणी ग्रहण न करता उपास करतात. दिवसभर पोटात अन्न नसल्याने, पाण्याचा थेंब नसल्याने स्वाभाविकच मनुष्य निस्तेज होतो, चिडचिडा होतो, त्याचे सात्विक भाव हरवतात, मग असा भक्त त्या सुहास्यवदनी मंगलमूर्तीला कसा बरे आवडेल? त्यामुळे अशा प्रसंगी पूर्णवेळ उपाशी न राहता उपासाला चालणारे पौष्टिक आणि सात्विक पदार्थ खाऊन उत्सव आणि उपास यांचे पावित्र्य जपता येईल. यानिमित्ताने छोटेखानी स्नेहभोजन करणेही शक्य आहे. शिवाय, रात्री उपास सोडताना मोदकाचा पहिला घास आपल्याही चेहऱ्यावर ‘मोद’ म्हणजेच आनंद आणेलच!
सर्व शास्त्रांमध्ये पारंगत असलेल्या गणपतीने दूर्वांचे आयुर्वेदातील महत्त्व ओळखून त्यांना जवळ केले. अंगारकीच्या निमित्ताने आपलाही त्यांच्याशी क्षणिक संबंध येतो. त्यांचे महत्व जाणून तो संबंध आपण वाढवायचा असतो. अथर्वशीर्षात गणेशस्तुती केलेलीआहे, त्याचे पारायण केल्यामुळे आपली भाषाशुद्धी होते. भाषा शुद्ध झाली की विचार आणि आचारही शुद्ध होतात. मनुष्याची अंतर्बाह्य शुद्धी झाली की त्याच्या कामाचा श्रीगणेशा होतो आणि कामांनाही गती येते. एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या अंगारकी चतुर्थीने साध्य होतात, म्हणून तिचे महत्त्वही अनन्यसाधारण आहे!
माघी गणेश जन्म:
माघ मासात शुक्ल चतुर्थीला महोत्कट विनायकाचा जन्म झाला होता, म्हणून ही जन्म तिथी माघी गणेश जन्मतिथी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे अनेकांना ही तिथी तिलकुंद चतुर्थी म्हणून माहीत नसते. मात्र या निमित्ताने उत्सवाच्या प्रसंगी दानधर्म घडावा, सत्संग व्हावा हाच या व्रतामागचा शुद्ध हेतू आहे.