मित्रानो, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेला हरितालिकेचा उपवास केला जातो. यंदा हरितालिका 17 सप्टेंबर रोजी सकाळी सुरू होते आणि 18 सप्टेंबर रोजी दुपारी समाप्त होते. त्यामुळे हरितालिकेचा उपवास 17 सप्टेंबरला होणार की 18 सप्टेंबरला हे आपण जाणून घेऊया.
हरितालिकेच्या दिवशी स्वाती नक्षत्र असून त्यात शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास अपार सौभाग्य प्राप्त होते.वैदिक दिनदर्शिकेनुसार, यावर्षी हरितालिकेची भाद्रपद शुक्ल तृतीया तिथी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11:08 ते 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12:39 पर्यंत आहे. उदयतिथी व्रतासाठी ग्राह्य मानली जाते. त्यामुळे यंदा हरितालिकेचा उपवास सोमवार 18 सप्टेंबर रोजी केला जाणार आहे. स्वाती नक्षत्रात हरितालिकेचा पूजा मुहूर्त यावेळी हरितालिकेला इंद्र योग आणि रवि योग तयार झाला आहे.
18 सप्टेंबर रोजी दुपारी 12:08 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 06:08 पर्यंत रवि योग आहे. हरितालिकेच्या दिवशी चित्रा आणि स्वाती नक्षत्राचा संयोग होतोय. इंद्र योग पहाटेपासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत आहे. चित्रा नक्षत्र रात्री 12:08 पर्यंत आहे, त्यानंतर स्वाती नक्षत्र आहे.स्वाती नक्षत्रातील प्रदोष काळात हरितालिकेची पूजा होईल.
सूर्यास्त झाल्यावर हरितालिकेची पूजा सुरू होईल. या वर्षी हरितालिकेची पूजा संध्याकाळी 06:23 वाजता सुरू होईल. स्वाती नक्षत्रात माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे.
हरितालिकेच्या पार्श्वभूमीवर माता पार्वतीशी संबंधित कथा सांगितली जाते. असे म्हटले जाते की, पार्वतीच्या वडिलांची इच्छा होती की, तिने भगवान विष्णूशी लग्न करावे, परंतु पार्वतीचे शिवावर प्रेम होते. मग तिच्या मैत्रिणींनी पार्वतीजींना राजवाड्यातून नेले आणि एका गुहेत लपवून ठेवले. तेथे माता पार्वतीने कठोर तपश्चर्या करून भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त केले.